सरकारचं टेन्शन वाढलं! मनोज जरांगे पाटलांचं आजपासून पुन्हा उपोषण

मुंबईतील आंदोलनादरम्यान सरकारने मराठा आरक्षणाबाबत नवीन अध्यादेश काढल्याने मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन थांबवले होते. मात्र, अंमलबजावणी होत नसल्याने आजपासून आंतरवाली सराटीमध्ये जरांगे आमरण उपोषण सुरू करणार आहेत.

    जालना : मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या नवीन अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्याने मनोज जरांगे आज पासून पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहेत. याबाबत जरांगे यांच्याकडून सरकारला इशारा देखील देण्यात आला आहे. मुंबईतील आंदोलनादरम्यान सरकारने मराठा आरक्षणाबाबत नवीन अध्यादेश काढल्याने मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन थांबवले होते. मात्र, सरकारने या अध्यादेशाची तात्काळ अमलबजावणी करावी अशी मागणी सुद्धा मनोज जरांगे यांनी केली होती. मात्र, अंमलबजावणी होत नसल्याने आजपासून आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे आमरण उपोषण सुरू करणार आहेत.

    सगेसोयऱ्यांचा अध्यादेश निघाल्यानंतर जरांगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र, सरकारने जरांगे यांच्यासह मराठा समाजाची फसवणूक केल्याची टीका सोशल मीडियामधून होत आहे. या टीकेवरही जरांगे यांनी संताप व्यक्त केला असून टीकाकारांना थेट इशाराच दिला आहे.

    माझ्याविरोधात काहींनी सुपारी घेतलीय, यापुढे ते शांत न बसल्यास त्यांच्या पक्षासह त्यांच्या नेत्यांची नावं उघड करणार असल्याचा थेट इशारा जरांगेंनी दिला आहे. यासोबतच १० फेब्रुवारीपासून आपण कठोर आमरण उपोषण करणार, असंही जरांगे यांनी माध्यमांसमोर सांगितलं आहे.

    दरम्यान, मराठा बांधवांनी देखील या आंदोलनाला पाठींबा देऊन आपापल्या आमदारांना तातडीने फोन करावे, असं आवाहनही जरांगे यांनी केलं आहे. मी देखील सर्व आमदारांना विनंती करतो, की मराठ्यांच्या मुलाबाळांसाठी आपण कायद्याच्या बाजूने उभा रहावं, असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.