गरीबांची चूल महागड्या रॉकलने विझली; १०० रुपये लिटर

रॉकेल सुमारे १०० रुपयांपर्यंत पोचल्याने चूल अथवा स्टोव्ह पेटवायचा कसा, असा प्रश्न त्यांना पडला आहे. गेल्या काही महिन्यात इंधनांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅस सिलिंडरचा दरही आकाशाला गवसणी घालत आहेत. त्यापाठोपाठ रॉकेलच्या किमती वाढल्याने सामान्यांचे हाल होत आहेत.

  रायगड (आविष्कार देसाई) : गरिबांची चूल पेटवणारे रॉकेल (Kerosene) चांगलेच महाग (Costly) झाले आहे. रेशन दुकानांमध्ये (Ration Shop) एका लिटरसाठी ९८.५० रुपये लाभार्थ्यांना मोजावे लागत आहेत. गेल्या महिन्यात हेच निळे रॉकेल लिटरला ८५ रुपयांना विकले जात होते. आता तब्बल सुमारे १४ रुपयांनी ते महाग झाल्याने सर्वसामान्यांना महागाईचा (Inflation) झटका सरकारने दिला आहे.

  सरकारने आता कोणतीच वस्तू शिल्लक ठेवली नाही की जी महाग नाही. रॉकेल सुमारे १०० रुपयांपर्यंत पोचल्याने चूल अथवा स्टोव्ह पेटवायचा कसा, असा प्रश्न त्यांना पडला आहे. गेल्या काही महिन्यात इंधनांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल-डिझेलसह (Petrol-Diesel) घरगुती गॅस सिलिंडरचा (Domestic Gas Cylinder) दरही आकाशाला गवसणी घालत आहेत. त्यापाठोपाठ रॉकेलच्या किमती वाढल्याने सामान्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी जगायचे कसे, असा प्रश्न आहे.

  सिलिंडरपेक्षा रॉकेल महाग
  सरकार आता सर्वच वस्तू महाग करत आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्यांनी कसे जगायचे असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अॅड. राकेश पाटील यांनी केला आहे. घरामध्ये चार व्यक्ती आहेत. केरोसीनचे प्रमाण हे एक व्यक्ती दोन लिटर दोन व्यक्ती तीन लिटर, तर तीन आणि त्यापुढील व्यक्तींसाठी चार लिटर अशा प्रमाणात रेशनवर उपलब्ध होते. त्यामुळे चार व्यक्तींसाठी चार लिटर घेण्यासाठी सुमारे ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच गॅस सिलिंडरपेक्षा रॉकेल महाग ठरणार आहे.

  केंद्र सरकारच्या धोरणानुसारच दरवाढ
  केंद्र सरकारच्या धोरणानुसारच रॉकेलची दरवाढ करण्यात आलेली आहे. सदरची दरवाढ १ जुलैपासून अमलात येत आहे. तशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत, असे रायगडचे जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांनी सांगितले.