भोरमधील महाआरोग्य शिबिरात सर्वाधिक लोकांनी सहभाग नोंदविला : स्वरुपा थोपटे

आजपर्यंत भोर तालुक्यातील झालेल्या शिबिरात सर्वात जास्त लोकांनी सहभाग नोंदविला व सर्वसामान्य जनतेच्या आजाराच्या दृष्टीने वरदान ठरल्याचे राजगडच्या ज्ञानपीठ मानद सचिव स्वरुपा थोपटे यांनी सांगितले.

  भोर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात पुणे जिल्हा परिषद, भोर पंचायत समिती व आमदार संग्राम थोपटे मित्रमंडळ भोर विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमाने व डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, पिंपरी व भारती हॉस्पिटल, पुणे तसेच श्लोक हॉस्पिटल खेडशिवापूर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात तब्बल २ हजार ७२९ जणांनी लाभ घेतला.

  आजपर्यंत भोर तालुक्यातील झालेल्या शिबिरात सर्वात जास्त लोकांनी सहभाग नोंदविला व सर्वसामान्य जनतेच्या आजाराच्या दृष्टीने वरदान ठरल्याचे राजगडच्या ज्ञानपीठ मानद सचिव स्वरुपा थोपटे यांनी सांगितले.

  या शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात हृदयाच्या शस्त्रक्रिया, एंजिओप्लास्टी, किडनी स्टोन, पुरुषग्रंथी वाढणे, जिभेच्या शस्त्रक्रिया, किडनी आजार डायलिसिस, कान, नाक, घसा शस्त्रक्रिया, यकृताचे आजार शस्त्रक्रिया, हाडांचे फ्रॅक्चर शस्त्रक्रिया मणक्याच्या व गुढग्यांच्या शस्त्रक्रिया यांसह सर्व प्रकाराच्या तसेच रक्ताच्या सर्व तपासण्या मोफत केल्या.

  लहान मुलांचे आजार कान, नाक, घसा विकार स्त्रीरोग हृदयसंबंधीचे आजार हाडांचे विकार इत्यादींवर डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पिटल पिंपरी, भारती हॉस्पिटल पुणे तसेच श्लोक हॉस्पिटल खेडशिवापूर येथील आलेल्या तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केेले असूूून, आवश्यकतेनुसार गरजूंना पुढील मोफत उचारासाठी व शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे पाठविण्यात आले असल्याचे स्वरुपा थोपटे यांनी सांगितले.

  राजगड ज्ञानपीठच्या मानद सचिव स्वरुपा थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कार्यकर्ते, राजगड ज्ञानपीठचे विद्यार्थी व आरोग्य विभागातील आशा वर्कर यांनी महाआरोग्य शिबिराचे चोख नियोजन केले. शहरासह ग्रामीण भागातून आलेल्या सर्व रुग्णांना व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना भोजन व्यवस्था केली होती. शिबिरासाठी येण्या-जाण्यासाठी गाडीची व्यवस्था केली होती.

  आर्थिक विवंचनेत असलेल्या ग्रामीण भागांतील लोकांसाठी असे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करुन नागरिकांना निरोगी राहण्यासाठी प्रेरित करुन लवकर आजारांच्या निदानासाठी स्क्रिनिंग औषधांसह मूलभूत आरोग्य सेवा दिल्याने व सर्वसामान्य जनतेविषयी असलेला कळवळा पाहून अनेकांनी स्वरुपा थोपटे यांचे ऋण व्यक्त करून आभार मानले.

  यावेळी आमदार संग्राम थोपटे, तालुकाध्यक्ष शैलेश सोनावणे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, उद्योजक आनंदा आंबवले, अनिल सावले, तालुका महिला अध्यक्षा गीतांजली शेटे, राजेश शेटे, संदीप टोळे, सुनिल साळेकर, तौफिक अत्तार यांच्यासह नगसेवक, राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक उपस्थित होते.