ऐतिहासिक चक्रेश्वर तलावाची झाली दुर्दशा, पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

अंधार पडल्यावर डासांचे साम्राज्य तलावाभोवती निर्माण असून, शेकडोंच्या संख्येने ते नागरिकांवर तुटून पडत आहेत. त्यामुळे त्यांना लवकरच तलाव सोडून घर गाठावे लागत आहे.

    वसई । रविंद्र माने : भगवान परशुराम आणि गौत्तम बुध्दांच्या भुमीतील ऐतिहासिक चक्रेश्वर तलावाची अत्यंत दुरावस्था झाली असून, त्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

    नालासोपारा पश्चिमेकडील ऐतिहासिक शुर्पारकनगरी (सोपारा) त चक्रेश्वर तलाव आहे. या भगवान परशुरामाने विमलासुर राक्षसाचा वध केल्यानंतर आपली परशु या तलावात स्वच्छ केली होती, अशी अख्यायिका आहे. या तलावात पौराणिक दुर्मीळ अशा दगडाच्या मुर्त्या सापडल्या आहेत. त्यात भगवान विष्णुच्या महाकाय दगडी मुर्तीचाही समावेश आहे. या धार्मीक कार्यासाठी या ऐतिहासिक तलावाला पसंती दिली जाते. अशा या चक्रेश्वर तलावाचे महापालिकेने सुशोभिकरण करुन नागरिकांसाठी चालण्यासाठी ट्रॅक, ज्येष्ठांना बसण्यासाठी बाकडे, व्यायामाचे साहित्य, लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, पाळणे अशी खेळणी, फळ आणि फुलझाडे, उन्ह-पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत अशा व्यवस्था केल्या आहेत.

    तसेच तलावाभोवती रोषणाई आणि दिवे लावून त्याची शोभा वाढवली. त्यामुळे दररोज स्त्री-पुरुष, लहानमुले असे शेकडो जण सकाळी आणि विशेषतः सायंकाळी तलावावर जात असतात. तलाव परिसरातील सुविधांचा लाभ घेत असतात. तलावात असलेल्या माशांना खाद्य देऊन आनंद लुटत असतात. कित्येक ज्येष्ठ नागरिकांनी तर गप्पा-गोष्टींचा कट्टा या तलावावर जमवला आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून या तलावाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. व्यायामाचे साहित्य, खेळणी तुटून लोंबकळत पडली आहेत. तलावातील पाण्यात केरकचरा टाकला जात असून, निर्माल्यही टाकले जात असल्यामुळे मासे आणि कासव मरु लागली आहेत. या मेलेल्या जलचर प्राण्यांची दुर्गंधी पसरु लागली असून, नागरिकांना नाक बंद करुन चालण्याचा सराव करावा लागत आहे.

    अंधार पडल्यावर डासांचे साम्राज्य तलावाभोवती निर्माण असून, शेकडोंच्या संख्येने ते नागरिकांवर तुटून पडत आहेत. त्यामुळे त्यांना लवकरच तलाव सोडून घर गाठावे लागत आहे. व्यायामाचे साहित्य तुटून पडल्यामुळे व्यायाम करणाऱ्या नागरिकांमध्ये अपघाताचीही भिती वाढली आहे. पाण्यात टाकाऊ वस्तुही टाकल्या जात असल्यामुळे तलावाचे पावित्र्य धोक्यात आले आहे. तलावाच्या या दुरावस्थेची पालिकेच्या प्रभाग समितीकडे वारंवार तक्रारी केल्यानंतर काही महिन्यांपुर्वी पालिका अभियंत्यांनी पाहणी करुन दुरुस्तीचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर पालिकेचा कोणताही अधिकारी या तलावाकडे फिरकला नाही. त्यामुळे पालिकेच्या कारभाराविरुध्द संताप व्यक्त केला जात आहे.