कुटुंबाला सुकलेल्या लाकडांचा आधार, गॅसचे दर भडकल्याने गृहिणी वळल्या चुलीकडे

दैनंदिन जिवनात स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरचेही दर मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने गॅसचे जेवण परवडत नसल्याने गृहिणी वर्गाने आपला मोर्चा सुक्या काटक्या आणि लाकडे याकडे वळविला असल्याचे दिसून येत आहे.

    रोहा : सर्वच बाबतीत वाढणारी महागाई थांबण्याचे नावच घ्यायला तयार नाही. त्यातच दैनंदिन जिवनात स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरचेही दर मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने गॅसचे जेवण परवडत नसल्याने गृहिणी वर्गाने आपला मोर्चा सुक्या काटक्या आणि लाकडे याकडे वळविला असल्याचे दिसून येत आहे. जंगल संपत्तीचा दिवसेंदिवस ऱ्हास होत असतानाच सरपणासाठी लाकडे गोळा करताना जंगलात फार दूरवर जावे लागत असल्याने मध्यंतरी गृहिणी वर्गाने स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरलाच पसंती दिली.

    त्यातच चुलीवर स्वयंपाक करणे थोडे त्रासदायक असल्याने गॅसवरील जेवण गृहिणींना परवडू लागले. परंतु सद्यस्थितीत गॅसचे दिवसेंदिवस दिवस वाढते दर पाहता गृहिणींनी आपला मोर्चा आता सुक्या काटक्या व लाकडे यावर वळविला असल्याचे एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येत आहे. सुक्या लाकडांना पसंती मिळाल्याने डोंगर भागात राहणारे आदिवासी बांधव व अन्य जमातीतील महिला व पुरूष वर्गाला ही चांगला रोजगार मिळाला आहे.