वसई-विरार मॅरेथाॅनवर पुन्हा आर्मीचेच वर्चस्व

३० किमी नंतर राठोरचे स्नायु दुखावले आणि तो मागे पडला मात्र, अनुभव आणि उर्जेच्या जोरावर राठोरने दुसरे स्थान पटकावले फक्ट ५ मिनिटे तो पुनच्या मागे होता. उत्तराखंडच्या तडाखे चिंधुने तिसरा क्रमांक पटकावला.

    वसई । रविंद्र माने : ११ व्या वसई-विरार महापालिकेच्या आंतरराष्ट्रीय मॅरेथाॅनवर पुन्हा एकदा इंडीयन आर्मीने वर्चस्व मिळवले असून गोरखा रेजिमेंट (दार्जीलींग) च्या तीर्था पुन ने २ तास २१ मिनिटे आणि ४८ सेकंदात ४२ किलोमीटरची ही स्पर्धा जिंकली.

    पहाटे साडेपाच वाजता न्यु विवा काॅलेज विरार येथून या ४२ किमी अंतराच्या पुर्ण आणि २१ किमीच्या अर्थ मॅरेथाॅनला सुरुवात झाली. गत विजेता मोहीत राठोर, तीर्था पुन, प्राजक्ता गोडबोले, एम.डी.नुरहसन, तामसी सिंग, फुलन पाल, तडाखे चिंधु, पुनीत यादव, अरुण राठोड सारखे दिग्गज धावपट्टू या स्पर्धेत सहभागी झाले होते. तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त कृष्णा प्रकाश, मुंबईचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आणि माजी जिल्हाधिकारी कैलाश शिंदे हे या मॅरेथाॅनचे विशेष आकर्षण होते. या दोघांनीही ही स्पर्धा पुर्ण केली. स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेती पारुळ चौधरी इव्हेंट ऍम्बेसेडर म्हणून तर सुप्रसिध्द दिग्दर्शक, जेष्ठ अभिनेते महेश मांजरेकर, हास्यजत्रा फेम दत्तू मोरे, समीर चौगुले, अरुण कदम, ओमकार राऊत व्यासपिठावर उपस्थित होते. महापालिका आणि वसई तालुका कला-क्रीडा विकास मंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले होते.

    ४२ किमीच्या या लढतीत गत विजेता मोहीत राठोर आणि तीर्था पुन यांच्यात चुरस पाहायला मिळाली, उत्तरोत्तर ही चुरस वाढतच गेली. निम्म्याहून अधिक पुनसोबत राठोर धावत होता. ३० किमी नंतर राठोरचे स्नायु दुखावले आणि तो मागे पडला मात्र, अनुभव आणि उर्जेच्या जोरावर राठोरने दुसरे स्थान पटकावले फक्ट ५ मिनिटे तो पुनच्या मागे होता. उत्तराखंडच्या तडाखे चिंधुने तिसरा क्रमांक पटकावला. २१ किमी महिला गटात प्राजक्ता गोडबोले आणि पुरुष गटात एम डी नूरहसन यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

    १४ हजाराहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतलेली ही मॅरेथॉन स्पर्धा ५,११,२१ आणि ४२ किमी अंतर गटात संपन्न झाली. अर्ध मॅरेथॉन महिला गटात तामसी सिंगने द्वितीय आणि फुलन पालने तृतीय क्रमांक पटकावला आहे. तर २१ किमी पुरुष गटात पुनीत यादवने द्वितीय आणि अरुण राठोड याने तृतीय क्रमांक मिळविला. या विजेत्यांना रोख रक्कम आणि मेडल देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, राजेश पाटील, खासदार राजेंद्र गावित, मनपा आयुक्त अनिलकुमार पवार, माजी महापौर राजीव पाटील, नारायण मानकर, प्रवीण शेट्टी उपस्थित होते.