The interest rates on overdue electricity bills are even higher than those of banks

वीजबिल थकीत ठेवल्यास विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार व्याजाची आकारणी केली जाते. देयक तयार होण्याच्या ६० ते ९० दिवसांत भरल्यास १२ टक्के व्याज आकारले जाते. ९० दिवसांनंतर देयक भरल्यानंतर १५ टक्के व्याज लागले. वीज बिलांवर चक्रवाढ व्याज आकारले जात नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

    गोंदिया : वीजबिल वेळेवर भरलेले बरे, असेच म्हणण्याची वेळ येत आहे. कारण, वीज ग्राहकांना वीजबिलाच्या थकबाकीवर व्याज द्यावे लागत आहे. वीजबिल थकीत ठेवणे परवडणारे नाही. बॅंकांपेक्षाही हे व्याजदर जास्त आहे. त्यामुळे, व्याजाच्या रकमेचा भुर्दंड टाळण्यासाठी ग्राहकांनी वीज बिल वेळेवर भरणेच फायद्याचे ठरत आहे.

    थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. नामुष्की आणि व्याजाचा भुर्दंड असा दुहेरी फटका ग्राहकांना बसत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी वेळीच बिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. ग्राहकांनी वीजबिल तयार झाल्यानंतर ७ दिवसांत ते भरल्यास त्यांना १ टक्का तत्काळ देयक भरणा सूट मिळते. त्याबरोबरच वीजबिल थकीत ठेवल्यास विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार व्याजाची आकारणी केली जाते.

    देयक तयार होण्याच्या ६० ते ९० दिवसांत भरल्यास १२ टक्के व्याज आकारले जाते. ९० दिवसांनंतर देयक भरल्यानंतर १५ टक्के व्याज लागले. वीज बिलांवर चक्रवाढ व्याज आकारले जात नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महिनाभर महावितरणच्या विजेचा वापर केल्यानंतर वीजबिल आल्यावर मोबाईल ॲप आणि महावितरणच्या वेबसाईटवर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. जवळच्या बिल भरणा केंद्रावर किंवा महावितरण कार्यालयात जाऊन भरणा करता येतो.

    वसुलीसाठी पथकांची स्थापना

    जिल्ह्यातील वीजबिल थकबाकी वसूल करण्यासाठी विशेष पथकांची स्थापना केली आहे. थकबाकी पोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची पडताळणी करण्याची जबाबदारीही अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. वीज खंडित केल्यावरही कुणी वीज चोरून वापरत असेल तर त्या ग्राहकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.