पुणे मनपातील कंत्राटी कामगारांचा मुद्दा विधानसभेत, यांचे भवितव्य काय?; आमदार तुपे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

विधिमंडळात पुरवणी मागणी चर्चेत सहभाग घेतांना हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मुद्दा उपस्थित केला. या कामगारांचे भवितव्य काय? असा सवाल उपस्थित करीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी काय कार्यवाही करणार याची माहीती द्यावी, अशी मागणी केली.

    पुणे : विधिमंडळात पुरवणी मागणी चर्चेत सहभाग घेतांना हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मुद्दा उपस्थित केला. या कामगारांचे भवितव्य काय? असा सवाल उपस्थित करीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी काय कार्यवाही करणार याची माहीती द्यावी, अशी मागणी केली.

    पुणे मनपाने मागील १५ वर्षांपासून सेवेत असणाऱ्या २०० सुरक्षारक्षकांना अचानक कामावरून कमी केले आहे. यासाठी दिलेले कारणही न पटण्याजोगे आहे. ५८ किंवा ६० वर्षे निवृत्तीचे वय असताना ४५ वर्षे वयाची अट दाखवत या कामगारांना कामावरून कमी केले आहे त्यासंदर्भात आमदार तुपे यांनी विधानसभेत सवाल उपस्थित केला.

    अत्यंत तुटपुंज्या पगारावर हे कंत्राटी कामगार काम करत असून, यात अनेक महिलांचा समावेश आहे. यातील अनेकजणी विधवा, परितक्त्या असून नोकरी गेल्याने त्यांच्यासमोर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे महानरपालिकेत हे घडते आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. महिलांचा सन्मान करण्याची, त्यांना हक्क मिळवून देण्याची वक्तव्ये सत्ताधाऱ्यांकडून फक्त तोंडदेखली केली जातात का? अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

    महापालिकेसमाेर राष्ट्रवादीचे आंदाेलन

    ठेकेदारांच्या हितासाठी पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना वयोमर्यादेचे कारण देत काढून टाकणाऱ्या पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. केंद्र शासनाने निवृत्तीचे वय ६० व ५८ वर्ष निश्चित केलेले असताना पुणे महानगरपालिका प्रशासन केवळ ठेकेदारांच्या हितासाठी मनमानी पद्धतीने कारभार करत आहे. ४५ वर्षावरील कर्मचाऱ्यांना अचानकपणे या वयात कामावरून काढून टाकले आहे.  सदर कर्मचाऱ्यांना तात्काळ पुन्हा कामावर हजर करून घेण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

    तसेच या मागणीचे निवेदन महापािलका प्रशासनाला देण्यात आले. या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नंदा लोणकर, प्रदीप देशमुख, प्रदीप गायकवाड, अशोक कांबळे, वनराज आंदेकर, नितीन कदम, मृणालिनी वाणी, किशोर कांबळे, आदी पदाधिकारी, महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.