झेडपी समाजकल्याण वसतिगृह अनुदानाचा प्रश्‍न गाजणार; पंचायतराज समितीकडे सदस्य करणार तक्रार

जिल्हा परिषदेच्या (Solapur ZP) समाजकल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या वसतिगृह अनुदानाचा प्रश्नाबाबत पंचायतराज समितीकडे तक्रार करणार असल्याची माहिती सदस्यांनी दिली.

    सोलापूर : जिल्हा परिषदेच्या (Solapur ZP) समाजकल्याण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या वसतिगृह अनुदानाचा प्रश्नाबाबत पंचायतराज समितीकडे तक्रार करणार असल्याची माहिती सदस्यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत आश्रमशाळांकडे असणाऱ्या वसतिगृहांना अनुदान वितरित करण्यात येते.

    कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील शाळा बंद असल्याने वसतिगृह बंद होते. तसेच अनुदानाच्या प्रश्नाबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. असे असताना काही वसतिगृह अनुदान वितरित केल्याची बाब निष्पन्न झाली आहे. त्यामुळे आरटीआय कार्यकर्त्यांनी याबाबत माहिती मागितली आहे. पण अद्याप समाजकल्याण विभागाकडून ही माहिती दिली गेलेली नाही. त्यामुळे आरटीआय कार्यकर्त्यांनी सदस्यांकडे धाव घेतली आहे. पंचायतराज समिती दौऱ्यावर आल्यावर सदस्य ही बाब निदर्शनाला आणून देणार असल्याचे सांगण्यात आले.

    दलितवस्ती विकास योजनेतील कामे वाटप करताना समाजकल्याण समितीला विश्वासात घेतले नसल्याची तक्रार यापूर्वीच करण्यात आली आहे. सुमारे 55 कोटींची कामे वाटप करताना संबंधित गावच्या लोकसंख्येनुसार विचार केला गेला नाही, अशीही अनेक सरपंचांची तक्रार आहे. काही गावांना दुबार अनुदान दिले गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या कामांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

    मे महिन्यात पंचायत समितीचा दौरा पुढे गेल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. पण आता सुधारित दौरा जाहीर झाल्यामुळे अनेक विभागात धावपळ उडाल्याचे चित्र आहे. समितीने विभागनिहाय उपस्थित केलेल्या मुद्द्यांची उत्तरे तयार करताना अधिकाऱ्यांची धांदल उडाल्याचे दिसून आले.