राजापूर शहरात वाहन पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर, राजापूर नगरपरिषद नो पार्किंगचे बोर्ड लावण्यात व्यस्त

नगर परिषदेला या जागा खाली करुन घेण्यात कोणत्याही प्रकारचे स्वारस्य नसल्याची बाब अधोरेखीत झाली आहे.

    राजापूर शहरात दिवसेंदिवस वाहतुक कोंडीबरोबरच वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न जटील बनत चालला आहे. शहरात पुरेसे पार्किंगच नसल्याने शहरातील बाजारपेठेसह गल्लोगल्ली गाड्याच गाड्या अशी अवस्था बनली आहे. सध्यस्थितीत राजापूर शहरात पार्किंग ऐवजी नो पार्किंग झोन सर्वाधिक झाले आहेत. राजापूर शहरात यायचे म्हणजे अनेकांना आता नकोसे वाटु लागले आहे. शहरात मध्यवर्ती ठिकाणी एकही पुरेसे पार्किंग उपलब्ध नसल्याने वाहनचालकांना मनस्ताप झाला आहे. याचा सर्वाधिक परिणाम राजापूर बाजारपेठेतील व्यापारावर झाला असुन शहर बाजारापेठेत ग्राहक येण्याचेच टाळत आहे.

    आता राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातून खरेदीसाठी राजापूरात येण्याऐवजी ग्राहक जवळच्या लांजा, रत्नागिरी, खारेपाटण, कणकवली सह कोल्हापूर जाणे पसंद करत आहेत. राजापूर शहरात खरेदीला यायचे म्हणजे सर्वात मोठा वाहन पार्किंगचा प्रश्न उभा राहतो. जवाहर चौकासह संपुर्ण बाजारपेठ भागात कुठेही पार्किंगची पुरेशी व्यवस्था उपलब्ध नाही. राजापूर नगर परिषदेने शहरातील पुर्वीच्या सरदेश पांडे नाट्यगृहाच्या ठिकाणी काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करुन पे ॲण्ड पार्कची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र अद्यापही त्या जागेचा वापर पार्किंगसाठी केला जात नसल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. या पार्किंगच्या ठिकाणी राजापूर नगरपरिषद आठवडा बाजार भरवण्यात धन्यता मानत असुन पार्किंग सुविधा देण्याच्या बाबतीत मात्र उदासिन आहे.

    शहरात गेल्या काही वर्षात बहुमजली इमारतींना राजापूर नगरपरिषदेने परवानग्या दिल्याने टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र या इमारतींना परवाने देताना मोकळ्या जागेचा वापर हा पार्किंगसाठी करणे गरजेचे आहे. मात्र जागामालक, बिल्डर व त्या इमारतीतील रहिवाशी त्या पार्किंगच्या जागा अनधिकृत छपरपट्यानसाठी वापरत असल्याने तसेच अनेक इमारतींच्या स्टिल्टचा भागही पार्किंग ऐवजी व्यापारी कारणांसाठी वापरला जात असल्याने स्थानिक रहिवाशीही आपल्या गाड्या पार्किंगसाठी बाजारपेठेसह रस्त्यांचा वापर करत आहेत. मात्र नगर परिषदेला या जागा खाली करुन घेण्यात कोणत्याही प्रकारचे स्वारस्य नसल्याची बाब अधोरेखीत झाली आहे.

    राजापूर शहरात येण्यासाठी एकमेव तालिमखाना ते जवाहर चौक हा मुख्यरस्ता असला तरी या रस्त्यावर तहसिलदार कार्यालयाच्या अगोदरपासुन अगदी जवाहरचौकापर्यंत जागोजागी गाड्या पार्क करण्याशिवाय वाहन चालकाना पर्याय उरत नसल्याने शहरात वाहतुक कोंडीची समस्या उग्र रुप धारण करताना दिसुन येत आहे. तर शहरातील शिवाजी पथ मार्गही वाहनांच्या पार्किंगसाठी वापरला जात असल्याने वाहन चालवणे म्हणजे अपघाताला कारण अशी अवस्था राजापूरवासियांची झाली आहे. विविध करांसाठी नागरिकांना वेठीस धरणारी नगर परिषद आपल्या नागरिकांना सुविधा देण्यात असमर्थ ठरत आहे नव्हे तर त्यात नगर परिषदेला कोणत्याही प्रकारचे देणे घेणे नसल्याची बाब दिसुन येत आहे.

    शिवाजी पथाकडुन बाजारपेठेत येणाऱ्या प्रत्येक गल्लीचा वापर दुचाकी पार्किंगसाठी केला जात असल्याने नागरिकाना चालणेही जिकरीचे बनले आहे. तर शहर बाजारापेठेतही प्रत्येक दुकानासमोर वाहणे लावलेली असल्यामुळे बाजारपेठेतुन चालणे व कोणत्याही प्रकारचे वाहन चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे आता राजापूरात कोणी पार्किंग देता का पार्किंग. असे म्हणण्याची वेळ शहरवासीयांबरोबरच तालुक्याच्या ग्रामिण भागातुन येणाऱ्या नागरिकांवर आली आहे.