अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित राहिलेल्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची हकालपट्टी; जाणून घ्या कोणाकोणावर झाली कारवाई?

महाराष्ट्रात झालेल्या (Maharashtra Politics) दुसऱ्या शपथविधीनंतर अजित पवार (Ajit Pawar) उमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. महाराष्ट्रासाठी हा एक राजकीय भूकंप ठरला आहे. अजित पवार यांच्या या शपथविधीत राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते आणि आमदार उपस्थित राहिले होते. या शपथविधीला उपस्थित राहणाऱ्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

    मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या (Maharashtra Politics) दुसऱ्या शपथविधीनंतर अजित पवार (Ajit Pawar) उमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. महाराष्ट्रासाठी हा एक राजकीय भूकंप ठरला आहे. अजित पवार यांच्या या शपथविधीत राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते आणि आमदार उपस्थित राहिले होते. या शपथविधीला उपस्थित राहणाऱ्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

    अजित पवार यांच्या शपथविधीसाठी राजभवनात उपस्थित असलेले पक्षाचे सदस्य आणि प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांना पदावरुन बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या टि्वट हँडलवरुन गर्जे यांना बडतर्फ करण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे.

    अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर राष्ट्रवादीकडून कारवाई करण्यात येत आहे. अशीच कारवाई नागपूर ग्रामीणचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांच्यावर करण्यात आली आहे. त्यांची जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कार्याध्यक्ष राजू राऊत यांची नागपूर ग्रामीण राष्ट्रवादीचे हंगामी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

    जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेतेपदी

    शरद पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी आणि पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी वर्णी लावली. त्यानंतर अजित पवार यांनी मंत्री अनिल पाटील यांची प्रतोदपदी निवड केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि अनिल पाटील असे दोन प्रतोद झाल्याने व्हिप कुणाचा लागू होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.