The life of a girl who tried to commit suicide by consuming poison was saved due to the punctuality of the police personnel

स्थानिक रामनगर पोलीस ठाण्याला त्यांनी वैद्यकीय उपचारासाठी मदत मागितली. मात्र, मुलीची प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने त्यांनी पीडित मुलीला दुचाकीवरून जिल्हा रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. मुलीचा प्रियकर आणि त्याच्या बहिणीच्या मदतीने त्यांनी पीडितेला ताबडतोब दुचाकीनेच रुग्णालयात हलविले.

    चंद्रपूर : चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत २ पोलीस कर्मचाऱ्यांचे सध्या शहरभर कौतुक होत आहे. एका २१ वर्षीय मुलीने प्रेम प्रकरणात ‘ऑल आउट डांस नाशक द्रव्य’ प्राशन केले होते. मात्र, दोन पोलीस कर्मचा-यांच्या समयसूकतेमुळे सदर मुलीचे प्राण बचावले आहे.

    झाले असे की, तीन दिवसांपूर्वी एका तरुणीने प्रेम प्रकरणातून विष प्राशन केले. एका फ्लॅट मधील या घटनेची माहिती दुचाकीवर कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना ‘डायल ११२’ नंबरवरून प्राप्त झाली. क्षणाचाही विलंब न करता परवेश पठाण आणि मंगेश सायंकार या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. स्थानिक रामनगर पोलीस ठाण्याला त्यांनी वैद्यकीय उपचारासाठी मदत मागितली. मात्र, मुलीची प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने त्यांनी पीडित मुलीला दुचाकीवरून जिल्हा रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला.

    मुलीचा प्रियकर आणि त्याच्या बहिणीच्या मदतीने त्यांनी पीडितेला ताबडतोब दुचाकीनेच रुग्णालयात हलविले. गोल्डन अवर्स मध्ये उपचार मिळाल्याने अखेर मुलीचे प्राण बचावले आहे. तातडीने निर्णय घेत मुलीला मदत दिल्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान केला. त्वरेने निर्णय घेणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यांच्या समयसूचकतेला सलाम करण्यात येत आहे.