जनतेने दिलेले प्रेम हे कुठल्याही पदापेक्षा मोठी शिदोरी : पंकजा मुंडे

समाजातील गोरगरीब, फाटक्या तुटक्या, वंचित समाजाच्या सेवेसाठी व समाजकारणासाठी मी राजकारणात आहे. त्यामुळे मला राजकारणात पक्षनेतृत्वाने काय दिले, यापेक्षा जनतेने दिलेले प्रेम हे कुठल्याही पदापेक्षा मोठी शिदोरी आहे, असे सांगत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी कार्यकर्त्यांना शांत संयम व सबुरीचा सल्ला दिला. 

    पाथर्डी : समाजातील गोरगरीब, फाटक्या तुटक्या, वंचित समाजाच्या सेवेसाठी व समाजकारणासाठी मी राजकारणात आहे. त्यामुळे मला राजकारणात पक्षनेतृत्वाने काय दिले, यापेक्षा जनतेने दिलेले प्रेम हे कुठल्याही पदापेक्षा मोठी शिदोरी आहे, असे सांगत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी कार्यकर्त्यांना शांत संयम व सबुरीचा सल्ला दिला.

    गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या व महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव असलेल्या पंकजा मुंडे यांनी पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटादेवी दौऱ्यावर आई जगदंबा मोहटादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना शांत आणि संयमाचा सल्ला दिला. त्या म्हणाल्या, मी राजकारणात संयमी आहे. हा विनोद ठरेल, माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या डोळ्यातील भावना कळतात, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षरित्या आगामी काळात राजकारणाची दिशा बदलण्याचे स्पष्ट संकेत दिले.

    पंकजा मुंडे यांचा मोहटादेवी विश्वस्त मंडळाच्या वतीने साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, भाजप तालुकाअध्यक्ष माणिक खेडकर, मोहटादेवी संस्थांचे विश्वस्त डॉ. ज्ञानेश्वर दराडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

    अहमदनगर पाथर्डी ते मोहटादेवी पंकजा मुंडे यांचे जंगी स्वागत…

    अहमदनगर पाथर्डी ते मोहटादेवीपर्यंत गावोगावी पंकजा मुंडे यांचे गाडी थांबवून फुलांची पुष्पवृष्टी करत तर कुठे क्रेन, जेसीबीने पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात ‌येत होते.