चिपळूणातील मुख्य जलवाहीनीची अखेर दुरूस्ती, शहरातील काही भागात पाणी पुरवठा ठप्प

या कामासाठी चिंचनाक्यातून बाजारपेठेकडे जाण्यासाठी एकेरी मार्ग सुरू ठेवण्यात आला होता. तर बाजारपेठेतून वडनाका मार्गे वाहतूक वळवण्यात आली होती.

    चिपळूण : शहरातील शिवनदी पुलानिजक नदीतून गेलेल्या मुख्य जलवाहीनीची दुरूस्ती अनेक वर्षे रखडली होती. तेथे गळती लागल्यास मोठी यंत्रणा लावावी लागत होती. त्यामुळे आता नदीतील जलवाहीनी हटवून पुलावरून टाकली जात आहे. सुमारे ७० मिटर लांबीच्या या जलवाहीनीचे काम मंगळवारी रात्रीपासून सुरु झाले. त्यासाठी बाजारपेठ मुख्य रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू केली असून वडनाका मार्गे वाहतूक हलवण्यात आली आहे.

    नगरपरिषदेच्या जुन्या पाणी योजनेतील मुख्य जलवाहीनी शिवनदीतून नेण्यात आली होती. या नदीतील गाळ उपसा केल्यानंतर ही जलवाहीनी वर येऊन अनेकदा तिला गळती लागली होती. भर पावसात देखील गळती लागल्याने दुरूस्तीसाठी मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे या ठिकाणची पाईपलाईन स्थलांतरीत करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला होता. परंतू हे काम काही कारणास्तव लांबणीवर पडले होते. तसेच मुख्य पाईपलाईन असल्याने पाणी पुरवठ्याचा प्रश्न देखील होणार होता. त्यामुळे पुर्व तयारी करूनच हे काम करावे, असे ठरले होते. त्याप्रमाणे ७० मिटर लांबीची पाईपलाईन आधीच जोडून घेतले होते. तसेच शिवनदी पुलाला लोखंडी अॅंगल उभारून त्यावर पाईप ठेवण्याची पुर्व तयारी केली होती.

    त्यानुसार बाजारपेठेतील रहदारी कमी होताच मंगळवारी रात्री ९ वाजल्यापासून या कामाला सुरुवात करण्यात आली. क्रेनच्या साहाय्याने पाईप रात्रीच उचलून अँगलवर ठेवण्यात आली. त्यानंतर बुधवारी सकाळपासून दोन्ही बाजूने पाईपलाईन जोडण्याचे काम सुरू होते.

    या कामासाठी चिंचनाक्यातून बाजारपेठेकडे जाण्यासाठी एकेरी मार्ग सुरू ठेवण्यात आला होता. तर बाजारपेठेतून वडनाका मार्गे वाहतूक वळवण्यात आली होती. सायंकाळी उशीरापर्यंत हे काम सुरू होते. या कामामुळे बाजारपेठेसह मार्कंडी, काविळतळी, बहादूरशेखनाका या भागातील काही वस्तीत पाणी पुरवठा बंद ठेवला होता. त्यामुळे त्या-त्या भागात टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. खेर्डी येथील साठवणटाकी पासून खेंड येथील साठवण टाकीपर्यंत ही पाईपलाईन जाते. नदीतून पाईपलाईन असल्याने पाण्याच्या दबावामुळे चिंचनाका परिसरात नियमीत गळती लागत होती. मात्र आता या दुरूस्तीमुळे चिंचनाक्यातील मुख्य पाइपलाईनच्या गळतीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.