टिपू सुलतान नामकरणावरून महापौरांच्या कोलांट्या उड्या; भाजपचा आरोप

कुठेही नामकरणाचा ठराव मंजूर झाला नाही अशावेळी अनधिकृत नामकरणाला मुंबईच्या अधिकृत महापौरांचा पाठिंबा आहे काय? यापूर्वी मुंबई शहरात दोन रस्त्यांना 'टिपू सुलतान' असे नाव देण्यात आले आहे. त्या सभावृत्तांतात खाडाखोड, पेनने नाव लिहिणे व सहीमध्ये खाडाखोड याचा अर्थ काय?

    मुंबई : दोन दिवसांपूर्वी मालाड येथील उद्यानास ‘राणी लक्ष्मीबाई उद्यान’ असे नाव देण्याची मागणी करणाऱ्या मुंबईच्या महापौर आता कोलांटी उडी घेत टिपू सुलतानचे समर्थन का करत आहेत? असा सवाल पालिकेतील भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

    मालाड येथील उद्यानास टिपू सुलतान नामकरणाचा ठराव मुंबई महानगरपालिकेने मंजूर केला आहे काय? नसल्यास हे नामकरण अधिकृत आहे काय?

    महाराष्ट्र शासनाच्या जागेवरील मालाड येथील उद्यानास नामकरणाचा ठराव महाराष्ट्र राज्य शासनाने मंजूर केला आहे काय? असल्यास ठरावाची प्रत दाखवावी असे आवाहन भाजपचे गटनेते शिंदे यांनी केले आहे.

    कुठेही नामकरणाचा ठराव मंजूर झाला नाही अशावेळी अनधिकृत नामकरणाला मुंबईच्या अधिकृत महापौरांचा पाठिंबा आहे काय? यापूर्वी मुंबई शहरात दोन रस्त्यांना ‘टिपू सुलतान’ असे नाव देण्यात आले आहे. त्या सभावृत्तांतात खाडाखोड, पेनने नाव लिहिणे व सहीमध्ये खाडाखोड याचा अर्थ काय? अशी प्रश्नांची सरबत्ती स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनीही केली आहे.