एका गावाचे नाव चक्क जपान; बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार

  नंदूरबार : दिशादर्शक फलकावर गावाच्या नावावर अनेकवेळा खाडाखोड केल्याने अनेक वाद होत असतात. मात्र, नंदूरबार जिल्ह्यातील एका आदिवासी पाड्यावरील दिशादर्शक फलकावर एका देशाचा उल्लेख वाचताना अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
  अनेक गावकऱ्यांचे जपानला जाण्याचे स्वप्न झाले साकार
  साता समुद्रापार असलेल्या जपानला जाण्यासाठी अनेकांचे स्वप्न असते जपानची प्रगती विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात घेतलेली भरारी अनेकांना या देशाकडे आकर्षित करते. परंतु, जर सातपुड्याच्या दुर्गम भागात जपानला जाण्यासाठी रस्ता असल्याचे तुम्हांला सांगितले, तर ते खरे पटणार नाही. परंतु, ही किमया केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने, नंदुरबार जिल्ह्यातील डांब येथे लावण्यात आलेल्या गावांच्या दिशादर्शक फलकावर थेट जपान असा उल्लेख केला आहे.

  जिल्ह्यात चर्चेचा विषय
  नंदूरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेला डाब, तोडीकुंड, चिवलउतारा, खुंटगव्हाण, ओरपाफाटा आणि जमाना गावाकडे जाण्यासाठी डाब येथूनच रस्ता जातो. त्यामुळे या ठिकाणी तो दिशादर्शक फलक लावण्यात आला आहे. त्यावर शेवटचे गाव जपान असे लिहिल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
  नावात अशाप्रकारे झाला बदल
  मात्र, या दिशादर्शक फलकावर जोमाना या नावाला मा, च्या जागेवर पा आणि ना च्या जागेवरचा काना न वापरल्याने तेथे केवळ न राहिल्याने असे करत नावात छेडछाड करून त्याला जापान असे करण्यात आले आहे. जपान देशाचा उल्लेख या आदिवासी पाड्यावर आल्याने नंदूरबार जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या विषयाकडे दुर्लक्ष करीत असल्याच चित्र असून अधिकारी यावर बोलण्यास तयार नसल्याचे दिसत आहे.