
राज्यातील आणि देशातील आरक्षणच संपुष्टात आणण्याचा प्रयत्न भाजपा सरकार करत आहे. त्यांच्या जवळच्या सहा भांडवलदारांना सर्व ठेके दिले जात आहेत. लोकशाही राबविणारा देशातील सर्वात मोठा पक्ष काँग्रेस आहे, असे मत प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि आ. प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली. पंढरपूर तालुका काँग्रेसमध्ये गट-तट आहेत, हे मुळीच मान्य नाही.
पंढरपूर : राज्यातील आणि देशातील आरक्षणच संपुष्टात आणण्याचा प्रयत्न भाजपा सरकार करत आहे. त्यांच्या जवळच्या सहा भांडवलदारांना सर्व ठेके दिले जात आहेत. लोकशाही राबविणारा देशातील सर्वात मोठा पक्ष काँग्रेस आहे, असे मत प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि आ. प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली. पंढरपूर तालुका काँग्रेसमध्ये गट-तट आहेत, हे मुळीच मान्य नाही. काँग्रेस पक्ष हा एकच गट काँग्रेसमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. आ. शिंदे या मंगळवारी पंढरपूर तालुका काँग्रेसच्या आढावा बैठकीस आल्या होत्या. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे, शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी यांच्यासह जिल्हा आणि तालुका काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मागील काही वर्षांपूर्वी काँग्रेसचे हाताचा पंजा चिन्ह दिसताच, नागरिक काँग्रेसला निवडून देत होते. यामुळे काँग्रेस पक्षाने बूथ यंत्रणेवर लक्ष दिले नव्हते. पूर्वीची निवडणूक आणि आत्ताची निवडणूक यात मोठा फरक झाला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मागील महिन्यांपासून देशभर आढावा बैठकी घेण्याचा आदेश दिला आहे. याचाच एक भाग म्हणून बूथ यंत्रणा सज्ज करण्यासाठी पंढरपूरमध्ये आ. प्रणिती शिंदे यांनी आढावा बैठक घेतली. येथील धनश्री हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीस ज्येष्ठ नेत्या सूनेत्राताई पवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सूनंजय पवार, ज्येष्ठ नेते बजरंग बागल, देवानंद गुंड पाटील, सुहास भाळवणकर, किशोर महाराज जाधव, प्रशांत शिंदे, जिल्हा काँग्रेस ग्राहक संरक्षण सेलचे जिल्हाध्यक्ष संग्राम जाधव, मिलिंद अढवळकर आदींसह जिल्हा व पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार व खासदार ‘मविआ’चाच
आ. प्रणिती शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना जागृत केले. काँग्रेस पक्ष नागरिकांच्या मनामनात आहे. पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याजवळ जाणे गरजेचे आहे. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ निराधार योजना या दोन योजनांवर अधिकाधिक नागरिक जगत आहेत. नागरिकांना यासाठी मदत केल्यास, कॉंग्रेस पक्ष पुन्हा तळागाळात पोहचू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. पंढरपूरचा आमदार आणि सोलापूरचा खासदार हे दोन्ही यावेळी महाविकास आघाडीचेच असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नेते पदाधिकाऱ्यांकडे लक्ष देत नसल्याची तक्रार
काँग्रेसचे वरिष्ठ नेते पदाधिकाऱ्यांकडे लक्ष देत नाहीत, असा आरोप काही पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत केला. हा दावा खोडून काढत आ. प्रणिती शिंदे यांनी तुम्ही अगोदर माझ्या संपर्कात या, असा सल्ला दिला. त्यांच्या या गुगलीमुळे पद घेऊन मिरवणारे पदाधिकारी चांगलेच उघडे पडले. या बैठकीस काँग्रेसचे नागेश गांगेकर, अक्षय शेळके, अशोक पाटोळे, दत्तात्रय बडवे, शंकर सुरवसे, मधुकर फलटणकर, सागर कदम, समीर कोळी, अशपाक सय्यद, नागनाथ अधटराव, सेवादलाचे गणेश माने, राजश्री लोळगे आदींसह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.