पैशांवरून ऊसतोड मजूरांच्या ठेकेदारासह आई अन् पत्नीला मारहाण, चौघांना अटक

  पुणे : पैशांवरून ऊसतोड मजुरांच्या ठेकेदाराला, त्याच्या पत्नी आणि आईला लाथाबुक्यांनी मारहाण करत ठेकेदाराचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मात्र, पुणे पोलिसांनी लागलीच सुत्रे हलवत भिगवण पोलिसांच्या मदतीने ठेकेदाराची सुखरूप सुटका केली. तसेच, चौघांना बेड्याही ठोकल्या आहेत. मजुर परवितो असे सांगून त्यांच्याकडून पैसे मिळवित होते.

  संदीप गुलाब चव्हाण (वय २८), आकाश रमेश राठोड (वय ३५), निलकंठ बाबु आडे (वय ३१), दिगंबर रमेश राठोड (वय २८, सर्व रा. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बाळु घनशाम पवार (वय २५, रा. सोपाननगर, लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार गुरूवारी रात्री झाला आहे. ही कारवाई विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास सोंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रिंवद्रकुमार ढावरे, शांतमल कोळ्ळुरे व त्यांच्या पथकाने केली.

  आई व पत्नीला मारहाण

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हे रिक्षाचालक आहेत. त्यांनी तिघांकडून ऊसतोड मजूर पुरवितो, असे सांगून ७ महिन्यांपूर्वी साडेचार लाख रुपये घेतले होते. परंतु, त्यांनी मजूर पुरविले नाहीत, शिवाय पैसेही परत दिले नाहीत. पवार हे १८ जानेवारी रोजी जेवण करून घरी बसले होते. त्यावेळी चौघे त्यांच्या घरात घुसले पवार यांना शिवीगाळ व मारहाण केली. तर त्यांच्या आई व पत्नीला घरात ढकलून देत मारहाण केली. त्यानंतर त्यांचे स्वीफ्ट कारमधून अपहरण केले.

  आरोपी ताब्यात

  कुटूंबाने काही वेळात विमानतळ पोलीस ठाणे गाठले. विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास सोंडे यांनी घटनेचे गांर्भिय ओळखत तपासाच्या सूचना दिल्या. तांत्रिक तपास सुरूकरून आरोपींचा शोध सुरु केला. तेव्हा ते पवार यांना घेऊन सोलापूर रोडने जात असल्याचे व ते यवतच्या पुढे गेल्याचे लक्षात आले. विमानतळ पोलिसांनी भिगवण पोलिसांना माहिती दिली व या रोडवल नाकाबंदी करण्यास सांगितले. गाडी येताच पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत ठेकेदाराची सुटका केली. विमानतळ पोलिसांनी भिगवणला पोहचत आरोपींना ताब्यात घेतले.