जुन्या वादातून चुलत्याकडून पुतण्याचा खून

तीन महिन्यापूर्वी कळशी फेकून मारल्याच्या रागातून चुलत्याने पुतण्याचा पाण्याच्या दंडामध्ये मान दाबून खून केल्याची घटना खंडाळी (ता. माळशिरस) येथे शनिवारी (दि. १९) सकाळी ११.१५ च्या सुमारास घडली.

    अकलुज : तीन महिन्यापूर्वी कळशी फेकून मारल्याच्या रागातून चुलत्याने पुतण्याचा पाण्याच्या दंडामध्ये मान दाबून खून केल्याची घटना खंडाळी (ता. माळशिरस) येथे शनिवारी (दि. १९) सकाळी ११.१५ च्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपी चुलत्यास अटक करण्यात आली आहे. रामचंद्र दिनकर पताळे (वय ४५ रा. पताळे वस्ती, खंडाळी) असे खून झालेल्या पुतण्याचे नाव आहे. याबाबत अनिता रामचंद्र पताळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायण मुगुटराव पताळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

    आरोपी नारायण मुगुटराव पताळे याने मागील भांडणाचा राग मनात धरून माझे पती रामचंद्र दिनकर पताळे (वय ४५) राहणार पताळे वस्ती खंडाळी निमगावरोड यांना त्यांच्या शेतातील गहू पिकाच्या पाण्याच्या दंडामध्ये पालथे पाडून मानेवर पाय ठेवून श्वास कोंडून ठार मारल्याची फिर्याद वेळापूर पोलीस स्टेशनला अनिता रामचंद्र पताळे यांनी दिली आहे.

    वेळापूर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ३२२ कलम ३०२,३२३ प्रमाणे नारायण मुगुटराव पताळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव हे करीत आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून तीन महिन्यापूर्वी रामचंद्र व नारायण यांच्यामध्ये कळशी फेकून मारल्याच्या कारणावरून बाचाबाची झाली होती. तेव्हापासून त्यांच्यातील सवांद बंद होता. शनिवारी सकाळी ११.०० च्या सुमारास नारायण याने रामचंद्र यांना पाण्याच्या दंडामध्ये पालथे पडून मानेवर पाय ठेवून मारले.