नारायणगाव येथे तरुणाचा खून, २४ तासात पोलिसांनी लावला खुनाचा छडा

नारायणगाव येथील पुणे नाशिक बाह्यवळण रस्त्यावरील तेल ओढ्याच्या वरच्या बाजूला पडीक जमिनीवर गुरुवारी (दि.२५) रात्री दहाच्या सुमारास तरुणाचा खून झाल्याची घटना घडली असल्याची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

    नारायणगाव : नारायणगाव येथील पुणे नाशिक बाह्यवळण रस्त्यावरील तेल ओढ्याच्या वरच्या बाजूला पडीक जमिनीवर गुरुवारी (दि.२५) रात्री दहाच्या सुमारास तरुणाचा खून झाल्याची घटना घडली असल्याची माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. ईश्वर ज्ञानेश्वर पाटे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

    खुनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव साहेबराव नामदेव भूतांबरे (वय ४०) मुळगाव पिसेवाडी तालुका अकोले असून सध्या नारायणवाडी (नारायणगाव) येथे वास्तव्यास होता. शेतमजुरी व वेल्डिंग व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत होता. शिवविच्छेदनात डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.

    आर्थिक व्यवहार व अनैतिक संबंधातून खून झाला असून पुणे जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व नारायणगाव पोलिसांनी २४ तासाच्या आत मारेकऱ्यांचा शोध लावला असून आरोपी प्रियाल उर्फ बंटी गंगाराम खरमाळे (वय ३१) अमरवाडी खोडद व देवराम विठ्ठल कोकाटे (वय २७) कुंभारआळी खोडद यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे करीत आहे.