युवकाच्या खुनाचा अखेर छडा! जमीन खरेदीविक्रीच्या वादातून मित्रांनीच केला घात

ऑगस्ट महिन्यात साताऱ्यातील एकजण बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने दाखल केली होती. पती बेपत्ता झाला असून त्याचा मोबाईलही लागत नसल्याचे पत्नीने तक्रारीत म्हटले होते. कोणताही पुरावा नसल्याने बेपत्ता युवक नेमका कोठे गेला याचा शोध घेण्याचे आव्हान सातारा शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांपुढे उभे राहिले होते.

  सातारा : ऑगस्ट महिन्यात साताऱ्यातील एकजण बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने दाखल केली होती. पती बेपत्ता झाला असून त्याचा मोबाईलही लागत नसल्याचे पत्नीने तक्रारीत म्हटले होते. कोणताही पुरावा नसल्याने बेपत्ता युवक नेमका कोठे गेला याचा शोध घेण्याचे आव्हान सातारा शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांपुढे उभे राहिले होते. मात्र, गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास करत असताना या बेपत्ता युवकाचा खून झाल्याचे उघड केले असून याप्रकरणी सातारा तालुक्यातील तिघांसह पाडेगाव (ता. खंडाळा) येथील एकास अशा चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

  संदीप विष्णू संकपाळ (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून त्याचा खून झालेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अक्षय अविनाश चव्हाण (वय २८, रा. विघ्नहर्ता कॉलनी, कोंडवे, ता. सातारा), शिवाजी नामदेव शिंदे (वय ४३, रा. राजमुद्रा अपार्टमेंट, सैदापूर, ता. सातारा), विशाल शहाजी खावले (वय २१, रा. मतकर कॉलनी, शाहूपुरी, सातारा) व सुमित अशोक भोसले (वय ३०, रा. आंबेडकर कॉलनी, पाडेगाव, ता. खंडाळा) या चौघांना अटक केली आहे.

  दि. २१ ऑगस्ट २०२३ रोजी संदीप विष्णू संकपाळ हे बेपत्ता झाले असून त्यांचा मोबाईलही लागत नसल्याची तक्रार त्यांची पत्नी जान्हवी संकपाळ यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली होती. याबाबत दि. २२ रोजी ही तक्रार दाखल करुन घेण्यात आली होती. मात्र, मोबाईल लागत नसल्याने संबंधित व्यक्ती कोठे गेली आहे. याबाबत तपास करण्याचे आव्हान सातारा शहर पोलीस ठाण्यासमोर उभे राहिले होते. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी संशयितांकडे चौकशी करत असताना संदीप संकपाळ यांचा सैदापूर येथील मित्र शिवाजी शिंदे याने जान्हवी संकपाळ यांच्याकडे संदीप कोठे आहे? अशी विचारणा केली होती. त्यामुळे पोलिसांनी शिवाजी शिंदे यांच्याकडे चौकशी करताना त्याने दिलेली माहिती संशय निर्माण करत होती. मात्र, शिवाजी शिंदे चाणाक्षपणे पोलिसांच्या चौकशीला येतच होता. त्यादरम्यान पोलीसांनी अत्यंत हुशारीने व कौशल्यपूर्ण गोपनियरित्या आणखी माहिती घेतली असता काही धक्कादायक माहिती समोर येवू लागल्याने शिवाजी शिंदे याचेवर संशय बळावला. पोलिसांनी खाक्या दाखवत संशयित शिवाजी शिंदे याने तपास कबुली दिली.

  या कारवाईत पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप जगताप याचे मार्गदर्शनाखाली सपोनि. अविनाश माने, पोउपनि सुधीर मोरे, पोहवा. किशोर जाधव, श्रीनिवास देशमुख, राहुल घाडगे, सुजित भोसले, पोना. पंकज मोहिते, निलेश जाधव, पोशि. संतोष कचरे, संतोष घाडगे, इरफान मुलाणी, मच्छिद्र माने, सुशांत कदम, प्रकाश सोनवले, चालक पोहवा. संतोष भोसले यांनी सहभाग घेतला होता.

  वनक्षेत्रात मृतदेह टाकला
  शिवाजी शिंदे व त्याच्या ३ साथीदारानी दिनांक २१/०८/२०२३ रोजी जमीन खरेदी-विक्री व्यवहाराचे कमिशन स्वरुपात दस्त झाल्यानंतर संदीप संकपाळ यास मोठी रक्कम मिळणार असल्याने कट रचून संदीप संकपाळ याचे सातारा तहसीलदार कार्यालय येथून चारचाकी वाहनातून अपहरण करुन गाडीतच खून केला. त्याचदिवशी रात्री संदीप संकपाळ यांचा मृतदेह पाडेगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) गावचच्या हद्दीत फॉरेस्टचे दाट झाडीत पुरुन टाकून विल्हेवाट लावली असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी शिवाजी शिंदेसह चौघांना अटक करत या खूनाचा गुन्हा उघड केला आहे.