
पुणे : नर्हे परिसरातील डोंगराच्या पायथ्याला रविवारी सकाळी सापडलेल्या त्या मृतदेहाचे गुढ उकलले असून, डोक्यात मारहाण करून त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. त्याची ओळख पटवत पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सौरभ रुपेश शिंदे (वय २३, रा. आंबेगाव पठार, कात्रज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सराईत गुन्हेगार अनिकेत मुकुंद परदेशी (वय-28 रा. अभिनव कॉलेज रोड, नंदनवन सिटी, नऱ्हे) याला अटक केली आहे. याबाबत सौरभचे वडील रुपेश नामदेव शिंदे (वय ४९ रा. आंबेगाव पठार पोलीस चौकी जवळ) यांनी सिंहगड रोड पोलिसांत तक्रार दिली आहे. ही घटना स्वामी नारायण मंदिरापाठीमागील डोंगराखाली घडली आहे.
डोक्यात कठीण वस्तूने मारून त्याचा खून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ व आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. सौरभ आरोपीच्या घरी जेवण करीत होता. तेव्हा त्याने अनिकेतच्या पत्नीबाबत अपशब्द बोलला. याचा राग मनात धरून अनिकेतने सौरभला स्वामी नारायण मंदिराच्या मागे असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने सौरभच्या डोक्यात कठीण वस्तूने मारून त्याचा खून केला.
डोंगराच्या पायथ्याशी एक मृतदेह पडल्याची माहिती
दरम्यान, सौरभ शिंदे हा आंबेगाव येथील रहिवासी असून शनिवारपासून तो बेपत्ता होता. त्याचा संपर्क होत नव्हता. दरम्यान, नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ असणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी एक मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना समजली. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करुन सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. तपास सहायक निरीक्षक राहुल यादव करीत आहेत.