नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येचे गुढ 11 वर्षानंतरही कायम, हत्येमागचा मास्टरमाईंड कोण?

अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचे गुढ अकरा वर्षानंतरही कायम राहिले आहे. दाभोलकरांवर गोळ्या झाडणाऱ्या सचिन अंदुरे, शरद कळसकर या दोघांना जन्मठेपेची शिक्षा झाली. पण या हत्येमागचा मास्टरमाईंड कोण? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीतच राहिला आहे.

  सातारा : अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचे गुढ अकरा वर्षानंतरही कायम राहिले आहे. दाभोलकरांवर गोळ्या झाडणाऱ्या सचिन अंदुरे, शरद कळसकर या दोघांना जन्मठेपेची शिक्षा झाली. पण या हत्येमागचा मास्टरमाईंड कोण? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीतच राहिला आहे. या हत्या प्रकरणाच्या तपासापासून अटक करण्यात आलेले आरोपी, जप्त करण्यात आलेले पिस्तुल, साक्षीदारांची उलटतपासणी अशा अनेक बाबतीत अजूनही गुढ सातारकरांमध्ये आजच्या निकालानंतरही कायमच आहे.
  नरेंद्र दाभोलकर यांचा खून मंगळवार, दि. २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेले असताना पुणे येथील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर अज्ञातांनी केला. ही घटना त्यावेळी वाऱ्यासारखी साताऱ्यात धडकली, पण या घटनेवर लगेच सातारकरांचा विश्वासच बसला नव्हता. पण त्यानंतर साताऱ्यातील त्यांच्या राहत्या घरी धावत गेले. याचवेळी गांधी मैदान येथे सातारकर एकत्र जमून सकाळी साडेअकराच्या दरम्यान, निषेधाची फेरी परिवर्तनवादी व सातारकर नागरिकांनी पोवईनाका येथील छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत काढली. या निषेध फेरीत अनेकजण नरेंद्र दाभोलकर यांचा खून करण्यात आला असला तरी त्यांना तात्काळ शोधा अन् या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालू नका. आम्ही सारे दाभोलकर आहोत. आम्ही त्यांच्यासाठी मरायला तयार आहोत अशा विविध घोषणा देण्यात आल्या होत्या.
  २० ऑगस्टच्या दुपारी नरेंद्र दाभोलकर यांचा मृतदेह साताऱ्यात आणण्यात आला. त्यावेळी शाहूनगर गुरुकृपा  हौसिंग सोसायटीच्या त्यांच्या निवासस्थानी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील, एन. डी. पाटील आदी अंत्यदर्शनासाठी आले होते. याचवेळी भाजप सरकारच्या वतीने अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेल्यांना सातारकरांनी मात्र विरोध केला. त्यावेळी कोणी घोषणा देवू नये, असे सांगितले. त्याचवेळी तत्कालीन डॉ. एन. डी. पाटील आणि कॉ. गोविंदराव पानसरे यांनी पोलिसांच्या या सूचनेविरोधात आवाज उठवत कार्यकर्त्यांच्या जनभावना लक्षात घेता त्यांना घोषणा देवू द्या, असे आवाहन केले. त्यानंतर पुन्हा पोलिसांच्या अन‌् शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्रातील अंधश्रध्दा निर्मुलनचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह त्यांच्यावर प्रेम करणारे आणि परिवर्तनवादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर उत्तम कबड्डीपट्टू असल्यामुळे क्रीडाक्षेत्रातील अनेकांनी साताऱ्यात त्यावेळी उपस्थिती दाखवली.
  झाडे आठवणींना उजाळा देतात
  नरेंद्र दाभोलकर यांनी देहदानाचा निर्णय घेतला होता. पण त्यांचा खून झाल्यामुळे कुटुंबियांनी हा देहदानाचा निर्णय न घेता माहुली येथे त्यांच्यावर मंगळवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर त्या परिसरात त्यांची आठवण म्हणून झाडे लावून तिथे त्यांची राख टाकण्यात आली. आज ही झाडे त्यांच्या अनके आठवणींना उजाळा देत आहेत. असं म्हटलं जाते, विचार पेरणारी व्यक्ती गेली म्हणून त्यांचे विचार मरत नसतात, हेच मंगळवार, दि. २० ऑगस्ट २०१३ रोजी सायंकाळी दाभोलकर यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी उसळलेल्या जनसागराने त्यावेळी दाखवून दिले होते. या जनसागरात सहभागी झालेल्या प्रत्येकाने आपल्या छातीवर ‘हम सब तैय्यार है’ असे वाक्य असणारा बिल्ला लावला होता. डॉ. दाभोलकर यांच्यावरील झालेल्या भ्याड हल्लयाचा निषेध करण्याबरोबरच परिवर्तनाच्या चळवळीत बलिदान देण्यास आम्ही तयार असल्याचा निर्धार बिल्ला परिधान करणारे नागरिक व्यक्त करत होते.
  समाजानं विचार उचलून धरले
  परिवर्तन हा सृष्टीचा नियम असला तरी ते घडवून आणण्यासाठी अनेकवेळा काही व्यक्तींना पुढाकार हा घ्यावा लागतो. असा पुढाकार घेणाऱ्या व्यक्ती समाजाचे आणि व्यवस्थेचे परिवर्तन करण्यासाठी स्वत:चे असे विचार मांडत असतात. अशा विचारांनीच भारुन त्यांचे शेकडो अनुयायी त्यांनी मांडलेल्या विचारांवर मार्गक्रमण करत असतात. व्यक्ती मारली म्हणजे त्यांचे विचार संपतील अशा धारणेतून झालेल्या हल्यानंतर समाजाने त्यांचे विचार तेवढ्याच ताकदीने पुन्हा उचलून धरले आहेत. डॉ. दाभोलकर यांच्यावरील हल्लयास ज अकरा वर्षे झाली. पण या अकरा वर्षात त्यांनी पेरलेले विचार मनात ठेवून काम राज्याच्या कानाकोपऱ्यातील लोक आजही काम करत आहेत.