युवकाच्या खूनाचे रहस्य उलगडले! प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच रचला कट

आपला नवरा दारू पिऊन त्रास देतो. त्याच्या त्रासातून कायमची सुटका करण्याच्या अविचारी विचारातून बायकोने आपली नवऱ्याचा आपली प्रियकराच्या मदतीने खून केल्याचा प्रकार दिंडोरी पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी दोघा आरोपींना अटक केली आहे.

    पिंपळगाव ब. : आपला नवरा दारू पिऊन त्रास देतो. त्याच्या त्रासातून कायमची सुटका करण्याच्या अविचारी विचारातून बायकोने आपली नवऱ्याचा आपली प्रियकराच्या मदतीने खून केल्याचा प्रकार दिंडोरी पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी दोघा आरोपींना अटक केली आहे.

    अनैतिक संबंध
    याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. २ जून रोजी नाशिक ते पेठ रस्त्यालगत देहरे वाडी ते रासेगाव रोडवर पिंपळगाव बसवंत येथील अनिल राजाराम झेंडफळे (मूळचा चिंचखेड) या इसमाचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत दिंडोरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी घटनेबाबत अधिक तपास केला असता मयताच्या पत्नीचे दीपक दत्तू गवे (रा. रवळगाव ता. दिंडोरी) हल्ली मुक्काम पालखेड बंधारा, ता. दिंडोरी या इसमाशी सहा वर्षांपासून अनैतिक संबंध होते.

    असा रचला कट
    मयत अनिल झेंडफळे हा आपली पत्नी सुनिता हीस दारू पिऊन त्रास देतो व वेड्यासारखा वागतो म्हणून संगनमत करून त्यास संपविण्याचे ठरवत गवे याने खूनाचा कट रचला. यासाठी त्याने प्रेयसीकडून पैसे घेतले. अनिल झेंडफळे यास दारू पाजून २ जूनच्या रात्री देहरे वाडी खराडी शिवारात घेऊन गेला. देहरे वाडी ते राशेगाव रस्त्याच्या लगत मयतच्या डोक्यात मागील बाजूस लोखंडी हातोडीने वार करून जीवे ठार मारले. मयताचे प्रेत पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने रस्त्याच्या कडेला फेकून दिले.

    यांनी केला तपास
    याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी मयताच्या पत्नीचे फोनच्या कॉल डिटेलच्या तसेच पिंपळगाव येथील सीसीटिव्ही फुटेजच्या माहितीच्या आधारे खूनाच्या गुन्ह्याची उकल करुन मुख्य आरोपी दीपक गवे यास अटक केली. दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, उपनिरीक्षक अजय कौटे, पोलीस नाईक धनंजय शीलावटे, बाळा पानसरे, संदीप कडाळे, युवराज खांडवी यांच्या पथकाने अधिक तपास करीत संशयित आरोपींना गजाआड केले आहे.