इंजेक्शन देण्यासाठी गळ्याला पट्टा आवळला अन् हनीचा मृत्यू झाला; 2 डॉक्टरांसह चौघांवर गुन्हा नोंद

वार्षिक लसीकरणासाठी क्लिनिकमध्ये आणलेल्या हनी श्वानाचा इंजेक्शन देण्यास गळ्याला पट्टा बांधल्यानंतर तो पट्टा घट्ट झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. चतु:श्रृंगी परिसरात ही घटना घडली असून, पोलिसांनी दोघा डॉक्टरांसह चौघांवर गुन्हा नोंद केला आहे.

    पुणे : वार्षिक लसीकरणासाठी क्लिनिकमध्ये आणलेल्या हनी श्वानाचा इंजेक्शन देण्यास गळ्याला पट्टा बांधल्यानंतर तो पट्टा घट्ट झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. चतु:श्रृंगी परिसरात ही घटना घडली असून, पोलिसांनी दोघा डॉक्टरांसह चौघांवर गुन्हा नोंद केला आहे. याबाबत बाणेर पाषाण लिंक रोडवरील एका ३५ वर्षाच्या महिलेने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी डॉ. संजीव राजाध्यक्ष (वय 60), डॉ. शुभम राजपुत (वय 35) आणि त्यांचे दोन सहायक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पाषाण येथील विगल्स माय पेट क्लिनिकमध्ये 17 नोव्हेबर रोजी सायंकाळी घडली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्याकडे हनी नावाचा लॅब्रोडोर जातीचा श्वान होता. त्याचे वार्षिक लसीकरण आणि नेल्स ट्रिमिंग करण्यासाठी त्याला विगल्स माय पेट क्लिनिकमध्ये आणले होते. हनीला डॉक्टरांच्या ताब्यात दिले. डॉ. राजपुत आणि त्यांच्या दोघे सहकाऱी त्यांच्याकडील पट्ट्याने हनीला झाडाला बांधण्यासाठी प्रयत्न करत होते.

    मात्र राजपुत यांनी लावलेला त्यांच्याकडील पट्टा हा त्याच्या गळ्याला घट्ट बसून त्याला फास बसला. त्यामुळे हनी खाली कोसळला. त्यानंतर पंधरा मिनिटांनी डॉक्टरांनी तक्रारदार यांना हनीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर दोन्ही डॉक्टर श्वानाच्या मृत्यूबाबत काही न बोलता तेथून निघून गेले. तक्रारदारांकडे हनी श्वान चाळीस दिवसाचा असल्यापासून तो बारा वर्षाचा होईपर्यंत त्यांच्याकडे होता. हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी चतुःश्रृंगी पोलिसांत धाव घेतली.