कृत्रिम हौद, मूर्तीसंकलन केंद्रांची संख्या वाढली; यंदाही नदीत विसर्जन करण्यास मनाई

पर्यावरणपूरक गणेशोत्सवातील एक पाऊल म्हणून गणेशमूर्तींचे विसर्जन यंदाही नदीत करण्यात मनाई करण्यात आली आहे.

  पुणे : गणेशाेत्सवाकरीता महापालिकेने कृत्रिम हौद, मूर्तीसंकलन केंद्र तसेच निर्माल्य संकलन केंद्रांची संख्या वाढवली आहे. जास्तीत जास्त नागारिकांनी पाण्याच्या टाक्‍यांमध्ये गणेश मुर्तींचे विसर्जन करावे. तसेच मूर्ती संकलन केंद्रात मूर्ती द्यावी, यासाठी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर जनजागृतीही केली जाणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवातील एक पाऊल म्हणून गणेशमूर्तींचे विसर्जन यंदाही नदीत करण्यात मनाई करण्यात आली आहे.

  केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच सर्वोच्च न्यायालयानेही “पीओपी’ अर्थात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना बंदी घातली असून, जलस्रोतांमध्ये त्यांचे विसर्जन करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे पुणेकरांनी नदीपात्र, तलाव, विहिरी तसेच इतर नैसर्गिक जलस्रोतांमध्ये गणेशमूर्ती विसर्जनास मानाई केली आहे. वर्ष 2022 मध्ये गणेशोत्सव काळात महापालिकेने क्षेत्रीय कार्यलयांतर्गत ३५९ लोखंडी टाक्‍या उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यात सुमारे २०९ टाक्‍यांची वाढ केली असून, ही संख्या आता ५६८ असणार आहे.

  तर, मूर्ती संकलन केंद्रांची संख्या गतवर्षी २१६ होती. ती यंदा २५२ असेल. तर मागील वर्षी गणेशोत्सवाच्या निर्माल्य संकलनासाठी २०६ कंटेनर होते. ही संख्या यंदा २५६ असेल. २२ प्रमुख घाटांवर सुमारे ४२ बांधीव पाण्याचे हौद असून, तेथेदेखील मूर्ती विसर्जन करता येणार आहे.

  महापालिकेने यावर्षीही पर्यावरणपूरक गणेशोत्सव विसर्जनासाठी नियोजन केले आहे. त्यासाठी टाक्‍या, मूर्तीसंकलन केंद्र व निर्माल्य संकलनावर भर देण्यात आला आहे. यंदाही संकलित निर्माल्यापासून खत करून शेतकरी तसेच नागरिकांना मोफत वाटप केले जाणार आहे. निर्माल्य टाकण्यासाठी आवश्‍यक कंटेनर, मूर्ती संकलन केंद्र व मूर्ती विसर्जनासाठीचे हौद, लोखंडी टाक्‍या यांसारख्या विविध प्रकारच्या सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे.

  गणेशोत्सवाच्या तयारीसाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभाग प्रमुखांच्या सातत्याने बैठका घेतल्या जात आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील उत्सवाच्या काळात शहरात स्वच्छता ठेवण्यास अधिक महत्त्व दिले जाणार आहे. त्यादृष्टीने घनकचरा विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.

  तपशील : २०२२ : २०२३ : झालेली वाढ

  लोखंडी टाक्या : ३५९ : ५५८ : २०९

  मूर्ती संकलन केंद्र : २१६ : २५२ : ३६

  निर्माल्य कंटेनर : २०६ : २५६ : ५०