हरिश्चंद्रगड-कळसुबाई अभयारण्य क्षेत्रात शेकरूंची संख्या होतीये कमी

पावसाळ्याच्या तोंडावर शेकरू झाडावर नवीन घरटी बांधतात. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात शेकरूंची गणना करतात. झाडावर प्रत्यक्ष दिसलेले शेकरू तसेच त्यांची नवी व जुनी घरटी यांची मोजदाद केली जाते.

  अकोले : शेकरू (Animal Shekru) हा प्राणी हरिश्चंद्रगड-कळसुबाई अभयारण्य तसेच लगतच्या भीमाशंकर अभयारण्य परिसरात आढळतो. हरिश्चंद्रगड परिसरातील कोथळे देवराई, तोलारखिंड तसेच अंबित, पाचनई, कुमशेत येथील वनांमध्ये शेकरूंचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे.

  पावसाळ्याच्या तोंडावर शेकरू झाडावर नवीन घरटी बांधतात. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात शेकरूंची गणना करतात. झाडावर प्रत्यक्ष दिसलेले शेकरू तसेच त्यांची नवी व जुनी घरटी यांची मोजदाद केली जाते.

  हरिश्चंद्रगड-कळसुबाई अभयारण्यात 30 मे ते 3 जून या कालावधीत भंडारदरा व राजूर वन्यजीव वनपरिक्षेत्रात ही गणना करण्यात आली.

  हरिश्चंद्रगड परिसरातील कोथळे, अंबित, पाचनई परिसरात 47 शेकरू दिसून आले. याशिवाय झाडांवर शेकरूंची नव्याने बांधलेली 177 तर जुनी 135 घरटी आढळून आली. शिवाय 42 घरटी सोडून दिलेली दिसली आंबा, हिरडा, लोध, उंबर, करप, करंबु, जांभूळ, आवळा, येहळा आदी झाडांवर शेकरू तसेच त्यांच्या घरट्याचे अस्तित्व आढळले.

  भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील कोळटेंभे व रतनवाडी परिसरातील जंगलातही 11 शेकरू प्रत्यक्ष दिसले. तसेच वापरात असलेली 19 घरटी दिसून आली. प्रत्यक्षात 58 शेकरू दिसले असले तरी नव्याने बांधलेली घरटी पहाता त्यांची संख्या 70 ते 75 असावी असा अंदाज आहे.

  गेल्यावर्षी अभयारण्यात 97 शेकरू दिसले होते. तसेच त्यांची 396 घरटी दिसून आली होती. गतवर्षी त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत शेकरूंच्या संख्येत दीडपट वाढ दिसून आली होती. यावर्षी मात्र त्यांच्या संख्येत घट झाली आहे.

  शेकरू हा राज्य प्राणी असून, त्याचे लाल डोळे तसेच त्याला झुपकेदार शेपटी असते. राज्यात काही ठिकाणच्या जंगलातच आढळत असलेल्या या प्राण्यांच्या जतन संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.