‘भेटी लागी जीवा…’ तुकोबांच्या पालखीचे पुण्यात आगमन

दाेन वर्षांनंतर पालखी साेहळा प्रत्यक्षात मार्गावरून येत असल्याने पालखीचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांची रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमली हाेती. पालखी साेहळा जसा पुढे सरकत हाेता, तशी दर्शनासाठी चढाओढही दिसून येत हाेती.

  पुणे : यंदा कोरोना महामारीचे संकट पूर्णत: नाहीसे झाले आहे. त्यानंतर आता अत्यंत भक्तिभावात अभूतपूर्व उत्साहात संतश्रेष्ठ जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३३७ पालखी सोहळ्याने आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari 2022) श्रीक्षेत्र देहूगाव येथून पंढरीकडे प्रस्थान झाले. त्यानंतर आज सायंकाळी ‘संत तुकाराम महाराज की जय’, या जयघोषात पुण्यात आगमन झाले. खांद्यावर भगवी पताका…गळ्यात तुळशीमाळ…टाळ-मृदुंगाचा नाद आणि विठू नामाचा गजर…अशा भक्तिरसात न्हाऊन निघालेली ‘इंद्रायणी’ पुण्यनगरीत विसावली.

  तुकाराम महाराजांच्या जयघोष करत पालखीचे स्वागत करण्यात आले. पुण्यात सकाळपासूनच वारकरी दाखल होण्यास सुरुवात झाली होती. लाखो वैष्णवांच्या मेळाव्यात पालखी आषाढी वारीकडे निघाली आहे. पुण्यात सकाळपासूनच भक्तिमय वातावरण झाले होते. आता प्रत्येक मंदिरात पालखीच्या निमित्ताने आकर्षक सजावटही करण्यात आली आहे.

  संचेती हॉस्पिटलवरून फर्ग्युसन रस्त्याने नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात विसाव्यासाठी संत तुकाराम महाराजांची पालखी जाणार आहे. आता ही पालखी गुरुवारी पूर्ण दिवस पालखी पुण्यात मुक्कामी असेल. त्यानिमित्त्ताने दर्शनासाठी पुणेकरांमध्ये उत्साहाचे वातावरणही दिसून येत आहे.

  सोहळा मार्गावर दर्शनासाठी गर्दी

  दाेन वर्षांनंतर पालखी साेहळा प्रत्यक्षात मार्गावरून येत असल्याने पालखीचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांची रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमली हाेती. पालखी साेहळा जसा पुढे सरकत हाेता, तशी दर्शनासाठी चढाओढही दिसून येत हाेती.

  पालखी मार्गावर रांगाेळ्याच्या पायघड्या 

  समर्थ रंगावली या ग्रुपच्यावतीने पालखी मार्गावर रांगाेळ्याच्या पायघड्या घालण्यात आल्या हाेत्या. या निमित्ताने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना अभिवादन केले गेले.

  पुणेकरांच्या वतीने जाेरदार स्वागत

  पालखी साेहळ्याच्या मार्गावर विविध स्वंयसेवी संस्था, गणेश मंडळे, राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने पालखीवर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. कळस आणि बाेपाेडी येथे महापालिकेच्या वतीने आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, रविंद्र बिनवडे यांनी पालखी साेहळ्याचे स्वागत केले.

  राजकीय फ्लेक्सबाजीचे दर्शन

  महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालखी साेहळ्यात राजकीय फ्लेक्सबाजी आढळून आली. माजी महापाैर मुरलीधर माेहाेळ यांनी खंडाेजीबाबा चाैक येथे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे भव्य कटआऊट लावून वारकऱ्यांचे स्वागत केले. तर पालख्यांचे स्वागत करणारे फलक लावतानाच भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करावे असे साकडे घातले. पालखी मार्गावर स्वागताचे फलक झळकत हाेते.