भूकंपाच्या सौम्य धक्याने पनवेल परिसर हादरला

या संदर्भातील माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सुरुवातीला स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांमध्ये देखील या बाबत संभ्रम असल्याचे पाहायला मिळाले.

    पनवेल-ग्रामीण : भूकंपाच्या सौम्य धक्याने रविवारी ( ता.26 नोव्हेंबर) पनवेल परिसर हादरल्याचे पाहायला मिळाले. सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मुबंई पासून 15 किलोमीटर अंतरावरील समुद्रात किनारपट्टीत रविवारी सकाळी काही सेकंदांसाठी भुकप्पाचे 2.9 रिश्टर स्केलचे सौम्य धक्के जाणवले या धक्क्याचा परिणाम नवी मुंबई आणि पनवेल परिसराला देखील जाणवला असून, भूगर्भातून येणारा काही सेकंदांचा आवाज आणि भूकंपाच्या सौम्य धक्क्याने पनवेल आणि नवी मुंबई लगतच्या इमारतींमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या बाबत नेमक काय झाल या संदर्भातील माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सुरुवातीला स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांमध्ये देखील या बाबत संभ्रम असल्याचे पाहायला मिळाले.

    मात्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांच्याशी या बाबत सपंर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजारा देला असून, सकाळी नऊ वाजून 50 मिनिटे 54 सेकंदाने नवी मुंबई लगतच्या समुद्र किनारपट्टीच्या आत भूगर्भात 15 किलोमीटरच्या आत 2.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला असल्याची माहिती दिली आहे. पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भूकंपाच्या या सौम्य धक्क्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असले तरी परिसरात कोणत्याही प्रकारची हाणी झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.