फुकट पेपर न दिल्याने पेट्रोल टाकून पेपर विक्रेत्याचा स्टॉलच जाळला; एकाला अटक

हप्ता व पेपर फुकट दिला नाही म्हणून संतप्त झालेल्या एका युवकाने जेलरोड येथील कोठारी कन्या शाळेजवळ असलेल्या किशोर सोनवणे (Kishor Sonawane) या पेपर विक्रेत्याचे दुकान पेट्रोल टाकून जाळून टाकल्याची घटना घडली आहे.

    नाशिकरोड : हप्ता व पेपर फुकट दिला नाही म्हणून संतप्त झालेल्या एका युवकाने जेलरोड येथील कोठारी कन्या शाळेजवळ असलेल्या किशोर सोनवणे (Kishor Sonawane) या पेपर विक्रेत्याचे दुकान पेट्रोल टाकून जाळून टाकल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित हप्ते मागणाऱ्या युवकास अटक करण्यात आली असून, हा युवक नशेमध्ये असल्याचे समजते.

    याबाबत अधिक माहिती अशी की, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे माजी अध्यक्ष किशोर सोनवणे यांचे जेलरोड येथील कोठारी कन्या शाळेजवळ पेपर विक्रीचे दुकान आहे. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास किशोर सोनवणे यांचा सहकारी शरद कदम पेपर विक्रीच्या स्टॉलवर बसलेला असताना या ठिकाणी समीर गायधनी नावाचा युवक आला व त्याने ‘पेपर फुकट दे व मला हप्ता दे’ अशी मागणी केली. कदम याने नकार देताच संतप्त झालेल्या गायधनी याने पेट्रोल टाकून संपूर्ण पेपर व दुकान जाळून टाकले.

    दरम्यान, या घटनेनंतर परिसरात धावपळ उडाली व पळापळ झाली. सदर घटनेत पूर्ण दुकान जळून खाक झाले असून, सुमारे १५ ते २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वृत्तपत्र विक्रेते किशोर सोनवणे यांचा स्टॉल जाळल्याचे समजताच वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सुनील मगर, महेश कुलथे, विजय उदावंत या सर्वांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संशयित आरोपीला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी संबंधितांनी केली.