पुण्यात टक्केवारीतील वाढ कुणाला तारक ? शिरूर,मावळात लक्षणीय घट दोन्ही गोटात चिंता वाढवणारी

पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (कोथरूड) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (रविवार पेठ) या दोन उमेदवारांमध्ये प्रमुख लढत झाली. या दोन्ही उमेदवारांसह २ प्रमुख उमेदवार रिंगणात होते. 

  दीपक मुनोत – पुणे: लोकसभा निवडणुकीत चौथ्या टप्प्यात पुणे शहर लोकसभा मतदारसंघात ५३.५४ टक्के, मावळ लोकसभा मतदारसंघातून ५४.८७ तर शिरूर लोकसभा मतदारसंघात ५१.४६ टक्के मतदान झाले. पुण्यात गेल्या निवडणुकीत ४९.८४ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत ३.७० टक्के मतदान वाढले.वाढलेले मतदान नेमके कोणाला फायदेशीर ठरणार याबाबत उत्सुकता आहे. पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (कोथरूड) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (रविवार पेठ) या दोन उमेदवारांमध्ये प्रमुख लढत झाली. या दोन्ही उमेदवारांसह २ प्रमुख उमेदवार रिंगणात होते.
  विधानसभा निहाय मतदान पाहता कसबा पेठ ५९.५४, कोथरूड  ५२.४३, पर्वती ५५ ४७, पुणे कॅन्टोन्मेंट ५३. १३,  शिवाजीनगर ५० ६७ ,वडगाव शेरी ५१.७१ टक्के मतदान झाले. वाढत्या मतदानाचा लाभ महायुतीला होईल, अशी चर्चाही होत आहे. मात्र कोथरूडमध्ये मविआतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचीही ताकद असून या पक्षाने एकदिलाने धंगेकर यांचे काम केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या मतदारसंघातून कोणाला किती मताधिक्य मिळणार हे ४ जून रोजी मतमोजणीत दिसून येईल.
  पुणे लोकसभा मतदार संघात मतदान करण्यासाठी उत्साहाने गेलेल्या अनेक मतदारांना मतदार यादीत त्यांचे नाव मृत असे नोंदविल्याचे आढळल्याने मनःस्ताप झाला. अनेकांची नावे मतदारयादीतून गायब झाली. मूळ मतदारांच्या नावाने अनेक जणांनी बोगस मतदान केले. आपल्या नावावर बोगस मतदान झाल्याचे दिसून आल्यानंतर संबंधितांमध्ये संताप व्यक्त होत होता. पुणेकरांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली असली तरी ४७ टक्के मतदार तिकडे फिरकलेही नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पुणे शहर लोकसभा मतदारसंघात १०० टक्के मतदान करण्यासाठी घरोघरी जाऊन प्रचार करण्याची घोषणा झाली होती ती फोल ठरली.
  शिरूरमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डाॅ‌. अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत आहे. यंदा शिरूरमध्ये केवळ ५४.१६ टक्केच मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत तब्बल ५.३० टक्के मतदान कमी झाले. शिरूर मतदारसंघात सर्वाधिक मतदान आंबेगाव तालुक्यात ६२.९५ टक्के झाले आहे.खालोखाल जुन्नरला ५८.१६ टक्के,खेड आळंदी मतदारसंघात ५७.७६ तर शिरूर तालुक्यात ५६.९१ टक्के मतदान झाले. भोसरीत ४९.४१ तर हडपसर मध्ये ४७.४१ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीत याच दोन शहरी मतदारसंघांनी साथ दिली तरी शिवसेनेच्या आढळराव पाटील यांना यश मिळाले नाही.
  दरम्यान, मावळ लोकसभा क्षेत्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजोग वाघेरे यांच्यात लढत झाली. मावळ लोकसभा मतदारसंघात ५.२४ टक्क्यांनी मतदान घटले. पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात यंदा दोन्ही शिवसेनेत चुरशीची लढत झाली. पण, मागील निवडणुकीपेक्षा पाच टक्क्यांनी मतदानात घट झाली. घटलेल्या मताचा कोणाला फटका बसणार याचे आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे.
  ठाकरेंना मानणाऱ्या वर्गाचा प्रभाव निर्णायक
   मावळमध्ये ५५.८७ टक्के मतदान झाले असून घाटाखालील उरण, कर्जत विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक अनुक्रमे ६७.७ आणि ६१.४० टक्के तर पनवेलमध्ये सर्वांत कमी,५०.५ टक्के मतदान झाले. मावळ तालुक्यात ५५.४२ तर चिंचवड येथे ५२.२० टक्के, पिंपरीत ५०.५५ टक्के मतदान झाले. खंडाळा घाटाखालील रायगड जिल्ह्यातील या तिन्ही मतदारसंघात ठाकरे यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा प्रभाव किती राहतो हे निकालासाठी महत्वाचे आहे.