Chhagan Bhujbal

सध्याच्या काळात उच्च नीचतेचे विष वाढत आहे. फुले, शाहू, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वाचलं पाहिजे. हे वाचलं की आपल्याला पुढे काय करायचं आहे हे कळेल. सध्या नवीन वर्ण व्यवस्था राज्यात येऊ पाहत आहे. आधीची वर्ण व्यवस्था वेगळी होती आणि आताची वर्ण व्यवस्था वेगळी आहे.

    पुणे : सध्याच्या काळात उच्च नीचतेचे विष वाढत आहे. फुले, शाहू, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वाचलं पाहिजे. हे वाचलं की आपल्याला पुढे काय करायचं आहे हे कळेल. सध्या नवीन वर्ण व्यवस्था राज्यात येऊ पाहत आहे. आधीची वर्ण व्यवस्था वेगळी होती आणि आताची वर्ण व्यवस्था वेगळी आहे. आता लायकी काढत आहेत. उषःकाल होता होता काळरात्र झाली, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. मी कोणाच्या विरुद्ध नाही मात्र हक्कांसाठी आता लढावं लागेल. आपापसात भांडू नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.महात्मा फुले यांच्या १३३ व्या स्मृतिदिनानिमित्त गंज पेठेतील समता भूमी येथे भुजबळ उपस्थित होते. भुजबळ यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    बाबासाहेब आबेडकरांनी हक्क दिले आहेत. कोणी गावात जाण्यास अडवले, तर त्याला एक महिन्याची सजा आहे. सगळे समाज एकत्रित राहिले पाहीजे. दुःख असेल त्याला वाचा फोडू, मजबुतीने उभे राहू, हक्क जतन करण्यासाठी लढू, आता थांबायचं नाही. हक्कांवर गदा येत असेल तर लढायचं. असं आवाहन छगन भुजबळ यांनी उपस्थितांना केलं.

    -भिडे वाडा लवकरच होणार
    भिडे वाड्याचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं. आता लवकरच त्याचं काम होईल. समता भूमी येथील जागा अपुरी पडत आहे. ती वाढवून द्यावी अशी आमची मागणी आहे. प्रसंगी त्यासाठी आंदोलन, उपोषण करायची वेळ आली तर आम्ही लढू. हक्कासाठी लढायच.

    -जोतिबा आधुनिक भारताचे शिल्पकार
    फुलेंना १८८८ साली महात्मा पदवी देण्यात आली. ते आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत असा इतिहासकाराने उल्लेख केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांना समाज क्रांतिकारक म्हटले आहे.

    संजय आवटे यांना महात्मा फुले समता पुरस्कार
    अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांना महात्मा फुले समता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी खासदार समीर भुजबळ, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, माजी सनदी अधिकारी महेश झगडे उपस्थित होते.

    यावेळी आवटे म्हणाले की, महात्मा फुले यांनी सत्य धर्म सांगितला. हा वारसा तुकारामाचा आहे. महात्मा गांधींनी सत्याचे प्रयोग केले. मात्र आज अस्त्याचे प्रयोग सुरू असल्याची टीका नावं न घेता पंतप्रधान मोदींवर केली. महिलांना सोबत घ्यावं लागेल. तरुणांकडे जावं लागेल. त्यांच्या भाषेत बोलावं लागेल असंही ते म्हणाले.