भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या महिला टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश, चतु:शृंगी पोलिसांच्या तपास पथकाची धडक कारवाई; दोघे अटकेत

भरदिवसा बंद फ्लॅट (Flat) फोडणाऱ्या महिला टोळीचा चतु:शृंगी पोलिसांनी (Police) पर्दाफाश केला असून, टोळीतील दोन महिला व त्यांच्या एका अल्पवयीन मुलाला पकडण्यात आले आहे. तर, चोरीचे सोने घेणाऱ्या ठाण्यातील दोन सराफांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

  पुणे : शहरात (Pune City) भरदिवसा बंद फ्लॅट (Flat) फोडणाऱ्या महिला टोळीचा चतु:शृंगी पोलिसांनी (Police) पर्दाफाश केला असून, टोळीतील दोन महिला व त्यांच्या एका अल्पवयीन मुलाला पकडण्यात आले आहे. तर, चोरीचे सोने घेणाऱ्या ठाण्यातील दोन सराफांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी तब्बल पाऊन किलो सोने, दीड किलो चांदीसह ४३ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

  खुशबू दिलीप गुप्ता उर्फ खुशबू कठाळू काळे (वय १९, रा. जालना) व अनु पवन आव्हाड उर्फ अनु राहुल भोसले (वय २६, रा. बीड) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. तर, त्यांच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तसेच, त्यांच्या दोन महिला साथीदार पसार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. ही कारवाई परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशीकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण आणि उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक यांच्या पथकाने केली आहे.

  बाणेर रस्त्यावरील सिंध सोसायटीत ११ डिसेंबर २०२२ रोजी बंद फ्लॅट फोडून तब्बल ६६ लाख ४२ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. चोरट्यांचा माग काढण्याबाबत चतु:शृगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सूचना देऊन संबंधित पथकाला मार्गदर्शन केले होते. त्यानूसार तपास पथकाचे उपनिरीक्षक महाडिक व त्यांचे पथक आरोपींचा शोध घेत होते. या कालावधीत परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले होते. त्यात संशयित आरोपी कैद झाले होते. चोरीत महिलांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

  पथकाने रेकॉर्डवरील महिलांची माहिती काढल्यानंतर संशयित महिलांबाबत माहिती मिळाली. नंतर या महिलांचा शोध घेत असताना त्या बीड व जालना जिल्ह्यातील असल्याचे समजले. त्यानूसार, पथकाने महिलांना बीड आणि जालना येथून सापळा रचून ताब्यात घेतले. तर, त्यांच्या एका अल्पवयीन मुलालाही पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. त्यांच्या दोन महिला साथीदारांसोबत हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून, त्या दोन फरार महिलांचा शोध घेतला जात आहे. तर, त्यांनी चोरीचे सोने विक्री केलेल्या दोन सरफांना अटक केली आहे.

  रेकी करून भरदिवसा घरफोड्या..!

  महिला रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्या रेकी करून घरफोड्या करतात. परिसरात फेरफटका मारून एखाद्या घराला कुलूप दिसताच ते घर फोडत असत. घराच्या खिडकी कापून ते अल्पवयीन मुलाला खिडकीतून आत शिरवत. तसेच, आतील दाराची कडी उघडण्यास सांगून त्यानंतर या महिला आत प्रवेशकरून घरफोड्या करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या महिलांनी यापुर्वीही असे गुन्हे केले आहेत. त्याबाबत तपास सुरू आहे.

  चोरीचे सोने घेणारे सराफ अटकेत…

  घरफोड्यांमधून चोरी केलेले सोने विकत घेणाऱ्या ठाण्यातील दोन सराफांना देखील पोलिसांनी पकडले आहे. महावीर धनराज चपलोत (वय ३५, कोपरी कॉलनी, ठाणे) व मदन रामेश्वर वैष्णव (वय २६, रा. कळवा, ठाणे) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे सोने जप्त केले आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील तब्बल ४३ लाख ४० हजारांचा ऐवज जप्त केला आहे.