Lalit Patil escape
Drug Mafia Lalit Patil Case

  पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत करणारे त्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तत्पूर्वी हलगर्जी व निष्काळजीपणा केल्याप्रकरणी प्रथम त्यांचे निलंबन केले होते. त्यानंतर नुकतीच त्यांना या गुन्ह्यात अटकदेखील करण्यात आली होती. अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) अरविंद चावरिया यांनी बंडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत.

  ललित पाटील ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल

  कोर्ट कंपनीचे पोलीस नाईक नाथाराम भारत काळे आणि पोलिस शिपाई अमित सुरेश जाधव अशी बडतर्फ (शासकीय सेवेतून बडतर्फ) करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे आहेत. ललित पाटील ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल होऊन तेथून ड्रग्जचे रॅकेट चालवित असल्याचे उघडकीस आले होते. पुण्यातील पहिलीच डील दोन कोटी १४ लाखांचे मेफेड्रॉन पकडले होते. त्यानंतर ललित पाटील याच्यावर चोख बंदोबस्त ठेवण्या ऐवजी त्याला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
  नाथाराम काळे, अमित जाधव यांच्या तपासात समोर आलेल्या बाबी
  नाथाराम काळे याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत तो ललितला सायंकाळी साडेसातच्या सुमारास एक्सरे काढण्यासाठी घेऊन गेला होता. तेव्हा ललित झटका देऊन पळून गेला, असे त्याने सांगितले होते. प्रत्यक्षात ललित पाटीलला एक्सरेसाठी तो घेऊनच गेला नसल्याचे ससूनच्या चौकशीतून समोर आले आहे. दरम्यान, ललित पाटीलला पळून जाण्यास मदत कणारा विनय अर्‍हानाचा चालक दत्तात्रय डोकेला काळेने स्वतःच्या मोबाईल फोनवरून तीन कॉल लावल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच जाधव यानेही दोनदा डोकेला फोन लावल्याचे निष्पन्न झाले.

  पोलीस नियंत्रण कक्षाला तो पळून गेल्याची माहिती

  २ ऑक्टोबरला ससून रूग्णालातून ललित पाटील हा चालत जात असल्याचे दिसत असून काळे आणि अमित जाधव दोघेही हॉस्पिटलच्या मधील कॅन्टीन जवळ एकत्रितरित्या टाळी देताना दिसले. तसेच ललित पाटील गेल्यानंतर पोलीस गणवेशावर दुसरा शर्ट परिधान केल्याचे सीसीटिव्ही फुटेज वरून दिसून आले आहे. तसेच ललित पाटील लेमन ट्री हॉटेलमध्ये शिरल्यानंतर काळे हा हॉटेलच्या व्यवस्थापकाबरोबर बोलत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ललित पाटील पोलिसांच्या ताब्यातून पळून गेल्याचा बनाव करून तीन तासानंतर पोलीस नियंत्रण कक्षाला तो पळून गेल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस यत्रंणा सतर्क झाली. त्यामुळे ललित पाटील याला पळून जाण्यास काळे आणि जाधव यांनी मदत केल्याचे निष्पन्न झाले.

  काळेवर यापुर्वीही निलंबनाची कारवाई
  नाथाराम काळे याच्यावर पत्नीचा छळ केल्याप्रकरणी २०१४ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळीही काळे याचे निलंबन झाले होते. काळे त्यानंतर चौकशीनंतर पुन्हा पोलीस सेवेत आला. तो गेल्या काही महिन्यांपासून कोर्ट कंपनीत नेमणूकीस होता. त्यानंतर त्याने ललित पाटील प्रकरणात खोटा व दिशाभुल करणारी माहिती दिल्याने पोलीस दलाची प्रतिमा मलिन केली.