कांद्याने केलाय चांगलाच वांदा; दर काय कमी होईना अन् सर्वसामान्यांना दिलासा मिळेना

दोन महिन्यांपूर्वी उच्चांक गाठलेल्या टोमॅटोने (Tomato Prices) नागरिकांना लाल केले होते. आता टोमॅटोचे दर नियंत्रणात असताना जणू इर्षा चढलेल्यागत कांद्याचे भावही (Onion Prices) प्रतिकिलो शंभरीवर पोहोचले आहेत.

    बीड : दोन महिन्यांपूर्वी उच्चांक गाठलेल्या टोमॅटोने (Tomato Prices) नागरिकांना लाल केले होते. आता टोमॅटोचे दर नियंत्रणात असताना जणू इर्षा चढलेल्यागत कांद्याचे भावही (Onion Prices) प्रतिकिलो शंभरीवर पोहोचले आहेत. गेल्या आठवड्यापासून कांद्याचे दर चढतीवर होते. कांद्याची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

    नवरात्रीच्या आधी कांद्याचे दर 50 रुपये प्रतिकिलो इतके होते. त्यानंतर उसळी घेत हे दर 70 ते शंभरीपर पोहोचले आहेत. सप्टेंबर महिन्यात महापुराने पुणे आणि नाशिक जिल्ह्यात कांदा साठवण चाळीमध्ये पाणी शिरले होते. कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच मागील महिन्यात परतीच्या पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा खराब झाला. दिवाळीनंतर बाजारामध्ये नवीन कांदा येण्यास सुरुवात होते.

    नवीन कांद्याचे उत्पादन लांबणीवर पडले आहे. त्यामुळे सध्या कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता नाही. बाजारात व्यापाऱ्यांकडे जुना कांदा शिल्लक आहे. जुना कांदा खराब झाला असल्याने व्यापाऱ्यांनाही नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र, चांगल्या जुन्या कांद्याला भाव आला आहे. पांढऱ्या कांद्याचे भाव वाढत असल्याने लाल कांद्याची मागणी तसेच विक्री वाढली आहे. एकंदरीत काद्यांच्या वाढलेल्या भावाने गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणले आहे.