स्ट्रॉबेरीला आलाय भाव, दर पोहोचले ३०० ते ४०० रुपये किलोवर

थंड हवेचे ठिकाण पाचगणी, भिलार, कासवंड, खिंगर, राजपुरी, जावली तालुक्यासह परिसरात सध्या स्ट्रॉबेरी पीक हंगामाला सुरुवात झाली असून, सध्या मुंबई, पुणे मार्केटमध्ये स्ट्रॉबेरी साडेतीनशे ते चारशे रुपये किलो प्रमाणे दर मिळत आहेत.

  पाचगणी : थंड हवेचे ठिकाण पाचगणी, भिलार, कासवंड, खिंगर, राजपुरी, जावली तालुक्यासह परिसरात सध्या स्ट्रॉबेरी पीक हंगामाला सुरुवात झाली असून, सध्या मुंबई, पुणे मार्केटमध्ये स्ट्रॉबेरी साडेतीनशे ते चारशे रुपये किलो प्रमाणे दर मिळत आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, जावली तालुक्यातील स्ट्रॉबेरीला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आता समाधान व्यक्त होऊ लागले आहे.

  यंदा पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई ऑक्टोबरमध्येच भासू लागली. या हंगाम स्ट्रॉबेरी कमी असल्याचे शेतकरी सांगतात. मुंबई बाजार समितीमध्ये महाबळेश्वर आणि नाशिक येथून प्रतिदिन २५ ते ५० टन स्ट्रॉबेरीची आवक होत आहे. सध्या बाजारात स्ट्रॉबेरीला १३० ते २३० रुपये भाव मिळत असून किरकोळमध्ये २५० ते ३०० रुपयांना विक्री होत आहे. गोड फळांपेक्षा आंबट, गोड चव असलेल्या स्ट्रॉबेरीची भुरळ पडू लागली असून, दर जास्त असले तरी समाधानकारक विक्री होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

  ऑक्टोबर महिन्यामध्ये जावळी तालुक्यातील कुडाळ, सर्जापूर, रुईकर, गणेश पेठ, आखाडे व पाचगणी परिसरातील भिलार, कासवंड, राजपुरी, पाचगणी परिसरात मोठ्या प्रमाणात सध्या स्ट्रॉबेरीची आवक सुरू झाली आहे. स्ट्रॉबेरी लागण होऊन विविध जाती रोपांना आता फळधारणा होऊ लागली आहे. यंदाच्या स्ट्रॉबेरीच्या हंगामात मदर प्लांटमधून रोपांची विक्रमी विक्री झाली आहे. कामा, रोजा, विंटर, डाऊन, मोरांनो, आरवन, स्वीट चार्ली आदी स्टोबेरीच्या रोपाना फळधारणा सुरू झाली आहे. त्यामुळे जागोजागी पुणे मुंबईचे व्यापारी येऊन स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांकडून स्ट्रॉबेरी विकत घेऊन ती पुढे मार्केटला पाठवत आहेत.

  सफरचंदपेक्षा दुप्पट दराने विक्री

  मुंबई बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये हिवाळा सुरु झाल्यापासून स्ट्रॉबेरीची आवक मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. तर सध्या विक्रमी दर स्ट्रॉबेरीला मिळत असून, सफरचंदपेक्षा दुप्पट दराने विक्री होऊ लागली आहे. शिवाय ग्राहकांकडूनही मागणी वाढू लागल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

  यंदा स्ट्रॉबेरीची लागत पाण्यामुळे कमी झाल्याने या वर्षीचा स्ट्रॉबेरीचा हंगाम विक्रमी असेल. दरही चांगला मिळण्याची शक्यता आहे. थंडी उशिरा सुरू झाल्याने सध्या स्ट्रॉबेरी उत्पादन थोडे कमी प्रमाणात आहे. मात्र जसजशी थंडी वाढेल तस तशी स्ट्रॉबेरी विक्रमी उत्पादन होऊ शकते.

  - प्रवीण पवार, स्ट्रॉबेरी उत्पादक