आघाडीपुढे एकजुटीचा पेच कायम; ठाकरे गटात प्रचारावरुन दुफळी, काॅंग्रेसमध्ये धुसफूसच

लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा सहाही विधानसभा मतदार संघात नियोजनपूर्वक प्रचार सुरू आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पक्षांतर्गत वादाचा सामना करावा लागत आहे.

  पुणे / दीपक मुनोत : लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा सहाही विधानसभा मतदार संघात नियोजनपूर्वक प्रचार सुरू आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पक्षांतर्गत वादाचा सामना करावा लागत आहे. आघाडीतील शिवसेनेच्या ठाकरे गटाने कसबा विधानसभा शिवसेनेला सोडणार, असा शब्द दिला तरच धंगेकर यांचा प्रचार करू अशी भूमिका पडद्याआड घेतली आहे. काँग्रेसमध्येही पद नियुक्ती वरुन कुरघोडी सुरू आहे. त्यामुळे मतदार संघात वातावरण निर्मिती करण्यात आघाडी कमी पडताना दिसत आहे.

  उमेदवारी देण्यावरून काँग्रेसमध्ये आबा बागुल यांच्या रूपाने उफाळलेली नाराजी, त्यानंतर मेळाव्यात रंगलेले नाराजी नाट्य आणि आता पद वाटपावरून कुरघोडी सुरू आहेत.

  पुणे शहर काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रशांत सुरसे यांना पदावरून हटवण्यात आले. त्यांच्या जागी प्रदीप परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली. संतप्त सुरसे यांच्या गटाने थेट दिल्लीतील कॉंग्रेसच्या अखिल भारतीय ओबीसी विभागाचे सरचिटणीस राहुल यादव यांच्याशी संपर्क साधला. यादव यांनी तातडीने आदेश काढून सुरसे यांची या पदावर पुनर्नियुक्ति केली.त्यामुळे वाद आणखी वाढला.

  मध्यंतरी टिळकवाडा येथील बैठकीत ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार दिला, तेच आता मोदीविरोधक म्हणून आमच्याशेजारी बसणार असतील, तर आम्हाला हे मान्य नाही, असे म्हणत एका काँग्रेस पदाधिकाऱ्याने बैठक सोडली होती. त्यांचा रोख‌ रोहीत टिळक यांच्यावर होता.

  त्यानंतर झालेल्या एका बैठकीत विशिष्ट नेत्याचा फोटो लावला नाही या कारणावरून मंडपवाल्याला मारहाण करण्यात आली होती. तसेच काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांचा प्रचार करू नका, अशा सूचना दोन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिल्या होत्या. यानंतर शहर प्रमुखांनी सारवासारव करत लोकसभा महाविकास आघाडीचे काम जोमाने सुरू आहे. शिवसेना प्रचारामध्ये सहभागी आहे,असा दावा केला. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटातील दुफळी समोर आली.

  दरम्यान, लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणूक; पक्षांतर्गत गटबाजी आणि दुफळी यांना काॅंग्रेस उमेदवाराला नेहमी तोंड द्यावे लागले आहे. विठ्ठलराव गाडगीळ यांच्या विरोधात तत्कालीन काँग्रेसचा, महाराष्ट्रातील मातब्बर नेता सक्रिय होता‌. त्यांच्या छुप्या पाठिंब्यामुळे आणि राम मंदिर प्रश्न भाजपने मोठ्या प्रमाणात पुढे आणल्याने गाडगीळ यांना फटका बसला. भारतीय जनता पक्षाचे ल.सो.तथा अण्णा जोशी पुण्यातून लोकसभेसाठी निवडून गेले. या मातब्बर नेत्याच्या छुप्या विरोधाची कुणकुण तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनाही होती. पुण्यातील विमानतळावर काही वेळ थांबून पुढे रवाना होण्यापूर्वी गांधी यांनी मातब्बर नेत्याला विमानतळावर पाचारण करुन गाडगीळ यांना साथ देण्याविषयी बजावले होते.

  याशिवाय, सुरेश कलमाडी यांच्या एका निवडणुकीत विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा गट उघडपणे काम करत होता.‌ त्या काळात दोन्ही काँग्रेसची युती होती. निवडणूक प्रचाराची सांगता करताना तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कलमाडी यांना साथ देण्यासाठी कार्यकर्त्यांना‌ आवाहन केले होते.‌त्यानंतर दिलजमाई होऊन कलमाडी यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र पुढे आली व ते काठावर विजयी झाले.

  आता शब्द कोण टाकणार?

  गटबाजीतून त्या त्या वेळी निघालेला मार्ग या अर्थाने हा इतिहास या निमित्ताने पुढे आला. मात्र यावेळी असा शब्द कोण कुणाला टाकणार असा प्रश्नच आहे. कारण तेव्हाची राजकारणाची पद्धत आणि सध्या सुरू असलेले राजकारण यात खूप फरक आहे. काँग्रेस आणि आघाडीला आव्हान कायम राखायचे असेल तर असा ‘शब्दʼ टाकणारा कोणी हवा आणि तो मानण्याची मानसिकताही !