‘इंद्रायणी’च्या खरेदीसाठी लगबग सुरू, वेल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक भाव; ‘या’ कारणामुळे उत्पादन कमी

इंद्रायणी तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या वेल्हे तालुक्यामध्ये तांदूळ खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली असून, उत्पादन कमी झाल्यामुळे यावर्षी तांदळाला चांगला भाव मिळत आहे.

  वेल्हे : इंद्रायणी तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या वेल्हे तालुक्यामध्ये तांदूळ खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली असून, उत्पादन कमी झाल्यामुळे यावर्षी तांदळाला चांगला भाव मिळत आहे. व्यापा-यांबरोबरच किरकोळ खरेदीदार देखील तांदूळ व भातसाळ खरेदीसाठी येत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाव अधिक असल्यामुळे शेतकरी आनंदी आहेत.

  पावसाच्या लहरीपणामुळे भात उत्पादन कमी झाले आहे; पण दरवाढ झाली असल्याने उत्पादन खर्च व प्रत्यक्ष मिळणारा भाव यात ताळमेळ बसला असल्याचे शेतकरी सांगतात. वेल्हे तालुक्यामध्ये विविध जातींचे भात उत्पादन घेतले जाते. मात्र या ठिकाणच्या इंद्रायणी तांदळाला राज्यासह परराज्यातूनही मागणी असते. इंद्रायणी तांदूळ सुवासिक असण्याबरोबरच चविष्ट आहे. पेरणीपासून भात कापणीपर्यंत पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, तर अनेक ठिकाणी तो लांबला, त्यामुळे भात पेरणीलाच उशीर झाला. भात कापणीवेळी देखील पावसाने हजेरी लावली, त्यात मोठ्या प्रमाणात अनेकांचे नुकसान झाले. पर्यायाने उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ३० ते ३५ टक्के घट पाहायला मिळत आहे.

  किरकोळ विक्रीचा दर ६५ दे ७० रुपये

  मागच्या वर्षी या इंद्रायणीला ४५ ते ५० रुपयांच्या पलीकडे भाव मिळाला नाही. मात्र, यावर्षी हाच तांदूळ ५५ ते ६० रुपये किलो दराने जात असून, याची किरकोळ विक्री ६५ दे ७० रुपये स्थानिक ठिकाणी झाली आहे.

  हातसडीचा तांदूळ शंभर रुपये किलो

  काही लोक हातसडीचा तांदूळ मागतात किंवा अनेक वर्षापासून हे लोक या भागातून हातसडीचा तांदूळ खरेदी करतात. त्याची किंमत किलोला शंभर रुपयांपेक्षा जास्त आहे. हातसाडीची प्रक्रिया थोडीशी कष्टमय असल्यामुळे त्याला इतका भाव मिळत आहे.