दख्खनची राणी नव्या रुपात ; आधुनिक डब्यांमधून थाटात प्रवास

डेक्कन क्वीनचा नव्या रंगसंगती आणि आधुनिक डब्यांचा प्रवास बुधवारी संध्याकाळी थाटात सुरू झाला; परंतु आगीच्या घटनांमुळे रेल्वे बोर्डाच्या नव्या नियमावलीनुसार डायनिंग कारच्या पॅण्ट्रीत अन्न शिजवण्यास मनाई करण्यात आली आहे.

    पुणे : डेक्कन क्वीनचा नव्या रंगसंगती आणि आधुनिक डब्यांचा प्रवास बुधवारी संध्याकाळी थाटात सुरू झाला; परंतु आगीच्या घटनांमुळे रेल्वे बोर्डाच्या नव्या नियमावलीनुसार डायनिंग कारच्या पॅण्ट्रीत अन्न शिजवण्यास मनाई करण्यात आली आहे.त्यामुळे गॅसच्या शेगडय़ा हद्दपार झाल्या असून त्याऐवजी इलेक्ट्रिक शेगडी आली आहे. त्यातच सीएसएमटीतील ‘बेस किचन’ चार वर्षांपूर्वीच आयआरसीटीसीने बंद केल्याने प्रवाशांची पंचाईत झाली आहे. एकतर मोबाईल अॅपद्वारे बाहेरील पदार्थ मागवावे लागणार किंवा ‘रेडी टू इट’ पदार्थांवर समाधान मानावे लागणार आहे.

     नव्या ढंगातील एलएचबी डब्यांमधून प्रवासाला सुरुवात
    नुकताच 1 जून रोजी या गाडीला 92 वर्षे पूर्ण झाल्याने तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी गाडी जुन्याच डब्यांमध्ये चालविण्यात आली होती. आता नव्या ढंगातील एलएचबी डब्यांमध्ये ती बुधवारपासून आपला प्रवास सुरू करीत आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे अशा दोन महानगरांचा रोजचा प्रवास करणार्यांना ती उपयोगी ठरणार आहे. तसेच गाडीला एलएचबी डबे जोडण्यात आल्याने तिची प्रवासी क्षमता देखील वाढली असून गाडी आता अधिक सुरक्षित आणि आरामदायी झाली आहे.

     प्रवाशांना गरमागरम नाश्ता
    याआधीच्या आयसीएफच्या डायनिंग कारमध्ये प्रवाशांना गरमागरम नाश्ता करायला मिळायचा. ऑम्लेट सँडविच, कटलेट सँडविच, साबुदाणा वडा आणि गरमागरम चहा आणि कॉफीचा स्वाद घेत मस्तपैकी पुणे वेळेत गाठता येत होते. परंतु यास आता विराम मिळाला आहे. ‘दख्खन राणी ही चालली वेगात’ ,’दख्खन राणीच्या पोटात कुशीत, शेकडो पिले चालली खुशीत’, अशी कवी वसंत बापट यांनी लिहिलेली कविताच आज अभिनेत्री स्पृहा जोशी हिने तिच्या यू टय़ूब चॅनलवर सादर करीत बहार उडवून दिली.