‘सेव्ह आरे’साठी एकता; जंगलाप्रमाणे जैवविविधतेचा प्रश्न

महाविकास आघाडी सरकारच्या (MVA) काळात मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्ग, गोरेगाव पहाडी आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेच्या पर्यायावर विचार सुरू होता. या नव्या सरकारचा पहिलाच निर्णय मुंबईवर घाला घालणारा असल्याचे त्यांनी म्हटले. आमचा राग मुंबईवर काढू नका, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.

  मुंबई : आम्हाला धोका दिला, पण मुंबईला धोका देऊ नका, असे आवाहन शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी राज्य सरकारला केले आहे. आरेचे जंगल (Aarey Forest) मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचे असून त्याठिकाणी असलेल्या जैवविविधतेचाही (Biodiversity) प्रश्न असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, मनसेचे नेते अमित ठाकरे (MNS Amit Thackeray) यांच्यासह पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शवला आहे.

  राज्यात शिवसेनेतील बंडखोर शिंदे गट (Eknath Shinde Group) आणि भाजपने (BJP) सत्ता स्थापन केल्यानंतर आता मुंबईतील आरेमध्ये पुन्हा एकदा मेट्रोचे कारशेड (Metro Carshed) स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नव्या सरकारने घेतलेल्या या पहिल्याच निर्णयानंतर पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या (MVA) काळात मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्ग, गोरेगाव पहाडी आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेच्या पर्यायावर विचार सुरू होता. या नव्या सरकारचा पहिलाच निर्णय मुंबईवर घाला घालणारा असल्याचे त्यांनी म्हटले. आमचा राग मुंबईवर काढू नका, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.

  पर्यावरणवाद्यांचे शांततापूर्ण आंदोलन
  आरे जंगलातील मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणवाद्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. पर्यावरणवादी संघटनांनी रविवारी सकाळी सर्व पर्यावरणवादी आणि संघटनांना जमण्याचे आवाहन केले होते. आरे वनक्षेत्रात पर्यावरणवादी संघटनांकडून आंदोलन केले जाणार आहे. पर्यावरणवाद्यांनी शांततापूर्ण आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

  निसर्गाचा बळी देऊन विकास नको- अमित ठाकरे
  आम्हाला विकास हवा; परंतु, पर्यावरणाचा बळी देऊन विकास नको, अशी भूमिका अमित ठाकरे यांनी मांडली आहे. चार दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने आरे कॉलनीतील २७०० झाडे तोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाअगोदर महापालिकेचे अधिकारी आणि एमएमआरडीएचे पदाधिकारी यांनी आरेतील स्थानिकांशी चर्चा केली. या चर्चेत ८२ हजार स्थानिकांनी वृक्ष तोडीवर आक्षेप घेत तक्रारी केल्या. जर ८२ हजार लोकांच्या तक्रारी असतील आणि तरिही झाडे तोडण्याचा निर्णय आपण घेत असू तर संशय निर्माण होणारच. आम्ही विकासाच्या विरोधात नाही. विकास हा नक्कीच व्हावा. परंतु, निसर्गाचा बळी देऊन नाही. आपल्यावर ग्लोबल वॉर्मिंगचे खूप मोठे संकट आहे. हे संकट मुंबई, महाराष्ट्र आणि जगावर आले आहे. सध्या अॅमेझॉनच्या जंगलाला मोठी आग लागली आहे आणि ही आग विझवण्यासाठी संपूर्ण जग एकवटले आहे. याप्रती सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. हे सर्व चालू असताना मुंबईचा श्वास असणारे आरे आपण नष्ट करायला निघालो आहोत, याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. त्यामुळे या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला आवाहन करतो की, व्यक्त व्हा. मी तुमच्या आणि निसर्गासोबत आहे, असे अमित ठाकरे यांनी म्हणाले.