CRIME

पुण्यात पुन्हा वाहनांची तोडफोड करत टोळक्याने राडा घातला असून, विमानतळ परिसरात कोयतेधारी टोळक्याने पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. टोळक्याने २० ते २५ वाहनांची तोडफोड केली आहे.

    पुणे : पुण्यात पुन्हा वाहनांची तोडफोड करत टोळक्याने राडा घातला असून, विमानतळ परिसरात कोयतेधारी टोळक्याने पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. टोळक्याने २० ते २५ वाहनांची तोडफोड केली आहे. मध्यरात्री झालेल्या या तोडफोडीमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या टोळीतील अनेकजण पसार झाले असून, त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    टोळक्याविरोधात गुन्हा दाखल

    याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हासिम खलील शेख याला ताब्यात घेतले आहे. तर, त्याचे अल्पवयीन दोन साथीदारही पोलिसांनी पकडले आहेत. याबाबत इनायत अली शौकत अली अन्सारी (रा. लोहगाव) यांनी तक्रार दिली आहे.

    आरोपींचा शोध सुरू

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव परिसरातील कळवड वस्ती भागात मध्यरात्री अचानक हातात कोयते व हत्यार घेऊन आले. त्यांनी अचानक रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाड्या लाथांनी पाडल्या. त्यानंतर हत्याराने या झाडांची तोडफोड केली. मध्यरात्री हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. लागलीच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. विमानतळ पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

    दरम्यान, पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू केला. विमानतळ पोलिसांनी दुपारी हासिम शेख याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांची माहितीही समोर आली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.