उंदराने औरंगाबादकरांच्या तोंडाचे पाणी पळवले! पहा नेमकं काय घडले?

    औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याला उन्हाळ्याच्या दिवसात अनेकदा पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. मात्र यावेळी औरंगाबादकरांना ऐन पावसाळ्यातही पाणी संकटाला सामोरे जावे लागत आहे. एका उंदराच्या (Mouse) कामगिरीमुळे औरंगाबाद शहरवासीयांचा पाणीपुरवठा तब्बल १३ तासांसाठी बंद पडला होता. तर आता शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, औरंगाबादकरांवर पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे.

    सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास जायकवाडी पंपगृहातील पंप क्रमांक ४ च्या फिडरमध्ये अचानक एक उंदीर घुसला. त्याने घातलेल्या गोंधळानंतर शॉर्टसर्किट होऊन ट्रान्सफॉर्मर खराब झाला. याबाबत माहिती मिळताच महानगरपालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र या संपूर्ण दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल १३ तास लागले. त्यामुळे या काळात शहरात थेंब भर सुद्धा पाणी आलं नाही.

    जायकवाडी धरणातून येणारी पाणीपुरवठा योजना या घटनेमुळे तब्बल १३ तास बंद होती. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. नागरिकांच्या नळाला एक ते दोन दिवस उशिरा पाणी येणार आहे. आधीच पाच ते सहा दिवसांनी येणारे पाणी आणखी दोन दिवसांनी वाढल्याने, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकीकडे जायकवाडी धरण १०० टक्के भरलंय असताना उंदराने केलेल्या प्रतापामुळे औरंगाबादकरांना मात्र त्यातले पाणी काही दिवस वेळेवर मिळणार नाही.