पार्किंग ठेकेदाराची ‘वसुली’ सुरुच, बाजार समितीच्या नाेटीसांना केराची टाेपली; सामान्यांना मनस्ताप

पुणे बाजार समितीच्या गूळ-भुसार बाजारात रस्त्यावर ताबा मारून पार्किंगचे पैसे कमविणार्‍या ठेकेदाराचा उद्योग सहा महिन्यांपासून सुरू आहे. बाजार समिती केवळ कागदी घोडे नाचवत असून त्या नोटीसांना ठेकेदार केराची टाेपली दाखवत आहे.

  पुणे : पुणे बाजार समितीच्या गूळ-भुसार बाजारात रस्त्यावर ताबा मारून पार्किंगचे पैसे कमविणार्‍या ठेकेदाराचा उद्योग सहा महिन्यांपासून सुरू आहे. बाजार समिती केवळ कागदी घोडे नाचवत असून त्या नोटीसांना ठेकेदार केराची टाेपली दाखवत आहे. त्यामुळे ठेकेदाराच्या उद्योगामुळे आणि संचालक मंडळाच्या दुर्लक्षाने बाजारात खरेदीसाठी येणार्‍या सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
  पुणे बाजार समितीने अवेरिया एंटरप्रायझेस या ठेकेदाराला गूळ- भुसार बाजारातील भूखंड क्रमांक ५८०, ५८१ बालाजी ट्रेडर्स ते रवि मसाले यांच्या मागील सर्व्हिस लेनमध्ये पार्किंग केलेल्या वाहनांकडून शुल्क वसुलीचा ठेका दिला आहे. ठरवून दिलेल्या जागेत पार्किंग शुल्क वसुलीचे आदेश असताना संबंधित ठेकेदाराने थेट अर्ध्याहून जास्त रस्त्यावर ताबा मारत आपले वसुलीचे दुकान सुरू केले आहे. यामुळे बाजारातील शेतमालाच्या वाहनांसह इतर वाहनांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. बाजारात येणारी मोठी वाहने वळविताना अडचण येत असून, परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. तर, रस्त्यावरील पार्किंगमुळे लगतच्या दुकानांमध्ये शेतमाल खाली करण्यासाठी वाहने लावता येत नाहीत.
  सहा महिन्यांपासून कारवाई नाही
  गेल्या सहा महिन्यांपासून हा उद्योग सुरू आहे. ही बाब निदर्शनास येऊनही समितीने केवळ नोटीसा बजावून त्यात ठरवून दिलेल्या जागेमध्येच दुचाकी वाहने पार्किंग करून इतरत्र ठिकाणी पार्किंग होणार नाहीत याबाबत आपल्या कर्मचार्‍यांना ताकीद देण्यात यावी. असा प्रकार पुन्हा घडल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे नमूद केले आहे. तरीही हा उद्योग सुरू असून प्रशासनाने नोटीसा बजाविण्याच्या पलिकडे कोणतेही काम केले नाही. मात्र, ठेकेदार प्रशासनाला खिशात घालत नोटीसांना कात्रजचा घाट दाखवत आहे.
  ठेकेदारावर सचिव, संचालक मंडळाचा वरदहस्त
  संबंधित ठेकेदारावर संचालक मंडळासह सचिवांचा देखील वरदहस्त असल्याची चर्चा बाजार समितीच्या गोटात आहे. त्यामुळे संबंधित ठेकाच त्या ठेकेदाराला नियमबाह्य पध्दतीने दिल्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. याबाबत बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत माहिती घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.