नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्याच्या निकालाची तारीख ठरली; 18 डिसेंबरला लागणार निकाल

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या बहुचर्चित व बहुप्रतीक्षित नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्याचा निकाल 18 डिसेंबर रोजी लागणार आहे. या काळात नागपुरात राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असेल. त्यामुळे केदार यांच्या खटल्याचा फैसला भरअधिवेशनात लागणार आहे.

    नागपूर : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या बहुचर्चित व बहुप्रतीक्षित नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील खटल्याचा निकाल 18 डिसेंबर रोजी लागणार आहे. या काळात नागपुरात राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असेल. त्यामुळे केदार यांच्या खटल्याचा फैसला भरअधिवेशनात लागणार आहे.

    नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 2002 मध्ये 152 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा केदार बँकेचे अध्यक्ष होते. ते या खटल्यातील मुख्य आरोपीसुद्धा आहेत. सहकार विभागाच्या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करत ही गुंतवणूक झाली होती. पुढे खासगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसेही बुडाले.

    केदार तसेच अन्य काही जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले. पुढे याप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात खटला भरण्यात आला. या कंपनीशी निगडित देशभर घोटाळे झाले. यात एकूण चार राज्यांमध्ये एकूण 19 ठिकाणी गुन्हे दाखल झाले. त्या सगळ्यांमध्येच प्रतिभूती दलाल म्हणून काम करणारे केतन सेठ आरोपी आहेत. हे सगळेच खटले एका ठिकाणी चालवावेत, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर 5 ऑक्टोबर 2021 रोजी न्यायालयाने तूर्त या खटल्यांची सुनावणी थांबविण्याचे आदेश दिले होते.

    न्यायालयाने 21 नोव्हेंबर रोजी सर्व आरोपींनी न्यायालयात हजर राहावे, असा आदेशही दिला होता. त्यानुसार, न्यायालयाने मंगळवारी सकाळी 11.30 वाजता सर्व आरोपींच्या हजेरीची माहिती घेतली. त्यावेळी, एक आरोपी काही कारणांमुळे गैरहजर होता. त्यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. व्ही. पेखले पूरकर यांनी दुपारी 1.30 च्या सुमारास निर्णय पुढे ढकलण्यात येत असल्याचे सांगितले व सायंकाळी 18 डिसेंबर ही पुढची तारीख दिली.