विधान परिषदेचे निकाल आले, चिंतन आणि प्रश्नांची चर्चा सुरु; ‘हे’ आहेत 5 महत्त्वाचे प्रश्न…

महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council) 5 जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकांचे निकाल आता हाती येत आहेत. त्यामध्ये तीन मतदारसंघाचे निकाल स्पष्ट झाले असून, इतर दोन जागांचे चित्र स्पष्ट होणे बाकी आहे.

  मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या (Maharashtra Legislative Council) 5 जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकांचे निकाल आता हाती येत आहेत. त्यामध्ये तीन मतदारसंघाचे निकाल स्पष्ट झाले असून, इतर दोन जागांचे चित्र स्पष्ट होणे बाकी आहे. नागपूरमध्ये भाजपला धक्का बसला असून, महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले (Sudhakar Adbale) विजयी झाले आहेत. पण आता विधान परिषदेचे निकाल जरी आले असले तरी अनेक महत्त्वाचे प्रश्न पुढे येत आहेत.

  राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपच्या जोडीला शिंदे गटाचे नेतेमंडळी तर महाविकास आघाडी विरोधात आहे. त्यात शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. भाजप असो किंवा महाविकास आघाडीतील घटक पक्ष सर्वांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. त्यात काही प्रमाणात यश देखील येताना दिसत आहे. पण काही ठिकाणी याचा कोणताही फायदा झाला नसल्याचे निकालाच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

  कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपने बाजी मारली आहे. नागपूरमध्ये महाविकास आघाडी समर्थित उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला. तर, औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात विक्रम काळे यांचा विजय झाला. आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) आणि शुभांगी पाटील (Subhangi Patil) यांच्यात प्रमुख लढत होत आहे. सध्या सत्यजीत तांबे हे आघाडीवर आहेत.

  पण आता हे 5 महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत…

  १. औरंगाबाद जिल्ह्यात एवढी मंत्रिपदं देवून फायदा का झाला नाही?

  २. विदर्भात भाजपनेच भाजपाची मतं पाडण्याची शक्यता किती?

  ३. या निकालानंतर सी व्होटरचा सर्वे खरा मानण्यास वाव आहे का?

  ४. जुन्या पेन्शन योजनेबाबत मतभेद सरकारच्या अंगाशी आले का?

  ५. सत्ता स्थापनेनंतरच्या या पहिल्या जाहीर निवडणुकीत झालेल्या या पराभवानं शिंदे – फडणवीस संघर्ष वाढेल का?