आरजीपीपीएल प्रकल्प चालू राहिला पाहिजे, भास्करराव जाधव यांचे शरद पवार यांना साकडे

आरजीपीपीएल प्रकल्प चालू राहिला पाहिजे. भास्करराव जाधव यांचे प्रयत्न सुरू आहे.

    गुहागर : गुहागर तालुक्यात असलेल्या रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रोजेक्ट या कंपनीमधील कर्मचाऱ्यांचा रोजगार टिकून राहावा यासाठी प्रयत्न करणारे आमदार भास्कर जाधव हे अडचणीत आलेला हा प्रकल्पही चालू राहिला पाहिजे यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. यासाठी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार. श्री शरदचंद्र पवार यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी पवार यांनी या प्रश्नी लवकरच दिल्लीमध्ये पेट्रोलियम मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्नमार्गी लावू असे आश्वासन दिले.
    यावेळी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रोजेक्ट हा १९६७ मेगावॅट क्षमता असलेला गॅसवर आधारित भारतातील सर्वात मोठा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे सुमारे १ हजार कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. परंतु गॅसची वाढलेली किमत आणि पर्यायाने निर्माण होणाऱ्या विजेचा दरही जास्त असल्याने वीज खरेदी करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. त्यामुळे हा प्रकल्प सध्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे.

    प्रकल्प सद्यस्थितीत अडचणीत

    रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रोजेक्टचा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीसोबत सन २०३२ पर्यंत वीज खरेदीचा करार असताना महावितरणने सन २०१४ पासून वीज खरेदी थांबवली आहे. तर दुसरीकडे भारतीय रेल्वेला सुरू असलेला ५४० मेगावॅट वीज पुरवठाही थांबला आहे. परिणामी हा प्रकल्प सद्यस्थितीत खूपच अडचणीत आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्नही निर्माण झाला आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आमदार भास्करराव जाधव हे ठामपणे उभे आहेत. त्यांचा रोजगार टिकून राहावा यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. परंतु त्याचबरोबर प्रकल्पही सुरू राहिला पाहिजे यासाठी त्यांनी ठोस प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी ते मुंबईत अनेकांना भेटले. त्यात आज खासदार पवार यांचीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली.

    दिल्लीत बैठक घेणार; पवारांचे आश्वासन

    यावेळी त्यांच्यासोबत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम कुमार सामंता, कंपनीचे सल्लागार हिरानंद हरचंदानी, सहाय्यक व्यवस्थापक सबरी गिरीश एन हेदेखील उपस्थित होते. कंपनीकडे वेगवेगळ्या राज्यातून विजेची मागणी आहे. परंतु वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेता गॅस कमी किंमतीत उपलब्ध होत नाही. कंपनीचे अधिकारी त्यासाठी अनेक प्रकार प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यात त्यांना यश येत नाही, ही बाब आमदार श्री. जाधव यांनी श्री. पवार यांच्याकडे मांडली आणि यावर मार्ग काढण्याची विनंती केली. पवार यांनी हा संपूर्ण विषय अत्यंत गांभीर्याने समजून घेतला आणि आमदार  भास्करराव जाधव, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांना लवकरच दिल्लीमध्ये बोलावून केंद्रीय पेट्रोलियममंत्री यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
    रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रोजेक्ट सध्या खूपच अडचणीत आला असून कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. हि कंपनी चालू राहण्यासाठी मी प्रयत्न करीत असून या कंपनीतील कर्मचाऱ्यांचे हित मी जाणले आहे. अडचणीत आलेली हि कंपनी मी बंद पडू देणार नाही.