कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याचे अधिकार राज्य सरकारलाच, जरांगे पाटील मागण्यांवर ठाम; नितेश राणेंनाही दिला इशारा

जरांगे यांनी बोलतांना पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. कुणबी प्रमाणपत्राबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याचे अधिकार राज्य सरकारलाच असतात.  

    नांदेड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात उपोषण करणारे मनोज जरांगे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, रविवारी त्यांनी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. तर आता हिंगोलीच्या कुरुंदा गावात यलगार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. जरांगे यांनी बोलतांना पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे.

    कुणबी प्रमाणपत्राबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, केंद्राने घटनादुरुस्ती केल्याशिवाय मराठा आरक्षण मिळणे शक्य नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याचे अधिकार राज्य सरकारलाच असतात.

    मर्यादा वाढवायची असेल तर तो केंद्राचा विषय असतो. आता काय करायचं ते राज्य सरकारने ठरवावे. आम्हाला 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्यावं, यावर आम्ही ठाम आहोत, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

    जरांगे पाटलांचा नितेश राणे यांना सल्ला

    मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करावं, दुसऱ्यांवर टीका करू नये, असं भाजप आमदार नितेश राणे म्हणाले होते. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. ते बोलले म्हणून आम्ही बोलतो. त्यांनी डिवचलं म्हणून मी बोललो. टीका करू नये, टार्गेट करु नये आम्ही शांत बसतो, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.