अंबेनळी घाट रस्त्यासह ‘हा’ मार्ग वाहतुकीसाठी राहणार बंद : महेश गोंजारी

दुरूस्तीच्या कामासाठी अंबेनळी घाट रस्ता व पार फाटा ते देवळी हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाबळेश्वर येथील उपविभागीय अभियंता महेश गोंजारी (Mahesh Gonjari) यांनी दिली.

    महाबळेश्वर : दुरूस्तीच्या कामासाठी अंबेनळी घाट रस्ता व पार फाटा ते देवळी हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाबळेश्वर येथील उपविभागीय अभियंता महेश गोंजारी (Mahesh Gonjari) यांनी दिली.

    जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये तालुक्याच्या पश्चिम भागातील रस्ते, घाट, पूल, शेती, घरे, जनावरे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. रस्त्यांवर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. नदी, नाले, ओढे पात्रातून मोठ्या प्रमाणावर दगड, माती, वृक्ष रस्त्यावर येऊन मोरी पुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. रस्ता वाहून जाणे, पूल वाहून जाणे अशाप्रकारे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुरूस्तीची कामे सुरू आहेत. या सर्व कामांची आमदार मकरंद पाटील यांनी मागील आठवड्यात भेट देऊन पाहणी केली होती.

    यावेळी मकरंद पाटील यांनीही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा, असे आदेश दिले होते. त्याचप्रमाणे या पावसाळ्यात रस्ता बंद राहणार नाही, याची खबरदारी घ्या, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास केल्या होत्या. मकरंद पाटील यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाबळेश्वर येथील उपविभागीय अभियंता महेश गोंजारी यांनी कामाचे नियोजन केले असून, सोमवारी (दि.20) महाबळेश्वर पोलादपूर या रस्त्यावरील किल्ले प्रतापगड फाटा ते मेटतळे यादरम्यानचा घाटरस्ता व कुंभरोशी येथून पारफाटा ते देवळी हा रस्ता असे दोन रस्ते दुरूस्तीच्या कामामुळे सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.