रस्ता केला काल अन् खोदला आज ! काय आहे प्रकरण जाणून घ्या…

महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) विविध विभागांत नियोजन नसल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. दोनच दिवसांपूर्वी डांबरीकरण केलेल्या टिळक रस्त्यावर (Tilak Road) जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदाई सुरु केली गेली. यामुळे खडबडून जागे झालेल्या पथ विभागाने काम थांबविण्याचे आदेश संबंधित ठेकेदार कंपनीला दिले.

    पुणे : महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) विविध विभागांत नियोजन नसल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. दोनच दिवसांपूर्वी डांबरीकरण केलेल्या टिळक रस्त्यावर (Tilak Road) जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदाई सुरु केली गेली. यामुळे खडबडून जागे झालेल्या पथ विभागाने काम थांबविण्याचे आदेश संबंधित ठेकेदार कंपनीला दिले.

    पुणेकरांना खड्डयातूनच काढावी लागली वाट

    शहरात गेल्यावर्षी झालेल्या खोदाई आणि त्यानंतर झालेली निकृष्ठ दर्जाची दुरुस्ती यामुळे पुणेकरांना खड्डयातूनच वाट काढावी लागली होती. प्रशासनावर सातत्याने टीका झाल्यानंतर विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी खोदाई करणे, रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरणाच्या कामात नियोजन करण्याचा निर्णय घेतला गेला. तसेच रस्ते दुरुस्तीसाठी सुमारे तीनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला गेला. त्यानुसार शहरातील रस्त्यांची कामे सुरु झाली. परंतु काही दिवसांतच हे रस्ते पुन्हा खोदाई केली जात असल्याची उदाहरणे समोर येत आहे.

    बैठकीनंतरही नियोजनशून्य कारभार सुरुच

    नुकतेच अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी खोदाई आणि त्यानंतरची दुरुस्ती, नव्याने डांबरीकरण करणे या कामांचे नियोजन करण्यासाठी संबंधित विभागाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला समान पाणी पुरवठा योजनेसाठी जलवाहिन्या टाकण्याचे काम करणाऱ्या एल एँड टी कंपनी, महावितरण, विविध मोबाईल कंपन्या, एमएनजीएल, पाणी पुरवठा विभाग आणि ड्रेनेज विभाग आदींची संयुक्त बैठक घेतली होती. आधी सेवा वाहिन्या टाकून घ्याव्यात आणि त्यानंतरच रस्त्यांचे डांबरीकरण केले जाईल, असा निर्णय या बैठकीत झाला होता. या बैठकीनंतरही नियोजनशून्य कारभार सुरुच असल्याचे स्पष्ट झाले.