जांभा दगडाने माथेरानचे रस्ते झाले मजबूत आणि सुरक्षित

माथेरानला सध्या असलेली ३८ प्रेक्षणीय स्थळे हीच माथेरानची खरीखुरी वैशिष्ट्ये. पण या पर्यटन स्थळांचा ऱ्हास हा दरवर्षी माथेरानला होत असलेल्या अतिप्रचंड पर्जन्यवृष्टीने होत असतो. त्यामुळे सर्व प्रेक्षणीय स्थळांकडे जाणाऱ्या तीव्र उताराच्या रस्त्यामुळे दरवर्षी मातीची धुप होऊन गटारे, मोऱ्या आणि रस्ते अनेक ठिकाणी वाहुन जात पॉईंटस नामशेष होण्याच्या मार्गावर होते.

  संतोष पेरणे, कर्जत

  सह्याद्री पर्वतराजी (Sahyadri Mountain Range) मध्ये समुद्रसपाटीपासून ८०३ मीटर उंचीवर गर्द हिरव्यागार वनराईची वृक्षसंपदा असलेले डोंगर माथ्यावर वसलेले, वाहनमुक्त, प्रदुषणमुक्त, थंड हवेचे ठिकाण म्हणजेच माथेरान (Matheran). स्वातंत्र्योत्तर काळात, तसेच सन २००३ च्या पर्यावरण खात्याच्या कडक निर्बंधाने प्रेक्षणीय स्थळांच्या (Tourists Spots) विकासाकडे दुर्लक्ष झाले.

  खरे पाहता माथेरानला (Matheran) सध्या असलेली ३८ प्रेक्षणीय स्थळे हीच माथेरानची खरीखुरी वैशिष्ट्ये. पण या पर्यटन स्थळांचा ऱ्हास हा दरवर्षी माथेरानला होत असलेल्या अतिप्रचंड पर्जन्यवृष्टीने होत असतो. त्यामुळे सर्व प्रेक्षणीय स्थळांकडे जाणाऱ्या तीव्र उताराच्या रस्त्यामुळे दरवर्षी मातीची धूप होऊन गटारे, मोऱ्या आणि रस्ते अनेक ठिकाणी वाहून जात पॉईंटस नामशेष होण्याच्या मार्गावर होते. त्यासाठी माथेरान नगरपरिषदेने (Matheran Nagar Parishad) ही बाब ध्यानात घेऊन माथेरानला गटारे, मोऱ्या, रस्ते, प्रेक्षणीय स्थळे वाचविण्यासाठी, पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी आणि पर्यावरण वाचविण्यासाठी कार्य हाती घेतले.

  सन २००५ रोजी झालेल्या अतिप्रचंड पर्जन्यवृष्टीमुळे अनेक महत्त्वाचे पॉईंट्स आणि तेथील अनेक रस्ते खचून नामशेष झाले होते. यातील माथेरानमधील पॉईंट्सचा राजा म्हणून ज्या पॉइंटची ओळख होती, तो पॉइंट म्हणजे पॅनोरमा हा पूर्णपणे नामशेष होत चाललेल्या पॉइंटचे नुतनीकरण हे पर्यावरणदृष्ट्या सुशोभित करण्यात आले आहे.

  १५ प्रेक्षणीय स्थळांचे रूप पालटले

  माथेरानच्या (Matheran) प्रवासात सुरुवातीला असलेले मायरा पॉइंट आणि हार्ट पॉइंट हे पण नामशेष झाले होते. हे पॉईंट पुन्हा एकदा नव्या दिमाखात उभे राहिले आहेत. त्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून विकसित करण्यात आले आहे. माथेरानला एकूण बदलाच्या वाटचालीत एमएमआरडीएने नगर परिषदेला मोठा निधी दिला आहे आणि त्याच माध्यमातून एकूण १५ प्रेक्षणीय स्थळांचे रूप बदलते आहे, तसेच आगामी काळातही बाकी राहिलेले पॉईंट्स टप्याटप्याने विकसित करण्यात येणार आहेत. कोकणात आढळणाऱ्या जांभा दगडाने हे सर्व पॉईंट नवीन रुल धारण करून पर्यटकांच्या दिमतीला हजर झाले आहेत. माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी म्हणून अभ्यासपूर्ण कार्य माथेरानला शिस्तीने केले.

  शिवसेनेच्या कार्यकाळात उत्तम काम

  माथेरानमध्ये (Matheran) येणारे पर्यटक यांच्यासाठी सात पॉइंट सर्कल पर्यटकांच्या पर्यटनाचे दृष्टीने महत्वाचे आहे. त्यातील चार पॉईंट्स विकसित होत असून यात रामबाग पॉइंट, बिग चौक पॉइंट, बेल्वेडियर पॉइंट आणि वन ट्री हिल या पॉइंटचा समावेश आहे. वन ट्री हिल सोडून बाकी तीन पॉइंटचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचवेळी लॉर्डस पॉइंट, एक्को पॉइंट, हनिमून पॉइंट, मलंग पॉइंट, कोरोनेशन पॉइंट, मालडुंगा पॉइंट, मंकी पॉइंट, खंडाळा पॉइंट आदी प्रेक्षणीय स्थळांचा दरवर्षी होणारा ऱ्हास आता होणार नाही, असे दिसून येत आहे. त्यात या प्रेक्षणीय स्थळांना शिवसेनेच्या कार्यकाळात जणू काही नव्यानेच जन्म मिळाला आहे.

  धूळविरहित सुबक रस्ते

  मुख्य रस्त्यापासून आतमध्ये जाण्यासाठी काही ठिकाणी क्ले पेव्हर ब्लॉकचे तर काही ठिकाणी जांभा दगडाचे खड्डेविरहित तसेच धुळविरहित सुबक रस्ते बनविण्यात आले आहेत. पॉईंटला जाताना पाण्याच्या योग्य निचरा होण्यासाठी बाजूला गटारे, मोऱ्या, रेलिंग बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे माथेरानला (Matheran) होणाऱ्या जोरदार पर्जन्यवृष्टीचे पाणी व्यवस्थितपणे या गटारांतून व मोऱ्यांतून वाहून जाईल. त्यावेळी रस्ते हे मातीधुप आणि वृक्षांची मुळांपासून पडझड देखील थांबणार आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या वृक्षांना आधार, वृक्ष जतन व वृक्षसंवर्धन म्हणून दगडी पार, तसेच दरड कोसळू नये व मृदा संधारण होण्यासाठी गॅबियन वॉल बांधून वृक्षांच्या मुळांना भक्कम आधार देण्यात आला आहे.

  रस्त्यांवर रेलिंग, पथदिवे

  पर्यटकांसाठी पॉईंट्सला जाणाऱ्या रस्त्यांवर पर्यटकांना काळोखात प्रवास करताना प्रकाश दिसावा यासाठी पथदिवे आणि सोलर दिवे लावण्यात आले आहेत. तर धोकादायक ठिकाणी पर्यटकांच्या जिवन सुरक्षिततेसाठी पॉईंट्सला संरक्षक रेलींग (कठडे) लावले आहेत. त्याचवेळी पॉईंट्सला नयनरम्य देखावे पाहण्यासाठी व चालून थोडासा क्षीण वाटत असेल, तर पर्यटकांना बसण्यासाठी सुबक बाकडे बसविण्यात आले आहेत. तर माथेरानमधील सर्व प्रेक्षणीय स्थळे या ठिकाणी महत्त्वाची गरज असलेले सुलभ शौचालयही त्या त्या मुख्य पॉईंट्सच्या बाहेर जवळपास बांधण्यात आले आहेत.